Contact Banner

पद्मश्री चैतराम पवार यांच्यासोबत डॉ. नितीन धांडे यांची पर्यावरण संवर्धनावर मनमोकळी चर्चा वृक्षलागवड, जलव्यवस्थापन आणि 'माझे शहर माझी जबाबदारी' अभियानाला मिळणार नवी ऊर्जा

 

dr-nitin-dhande-meets-padma-shri-chaitram-pawar-discusses-environment-and-my-city-my-responsibility-campaign

पद्मश्री चैतराम पवार यांच्यासोबत डॉ. नितीन धांडे यांची पर्यावरण संवर्धनावर मनमोकळी चर्चा

वृक्षलागवड, जलव्यवस्थापन आणि 'माझे शहर माझी जबाबदारी' अभियानाला मिळणार नवी ऊर्जा

जळगाव लेवाजगत न्यूज प्रतिनिधी-

जळगावातील प्रख्यात अस्थिरोगतज्ज्ञ तथा इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) चे सक्रिय सदस्य डॉ. नितीन धांडे यांनी पद्मश्री चैतराम पवार यांची सदिच्छा भेट घेऊन पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड आणि जलव्यवस्थापन या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली.

या भेटीत डॉ. धांडे यांनी जळगाव शहरात लोकसहभागातून राबविण्यात येत असलेल्या 'माझे शहर माझी जबाबदारी' अभियानाची माहिती दिली. शहर स्वच्छता, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना बळकट करण्यासाठी विविध उपक्रम या अभियानांतर्गत राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले. या अभियानात इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) सक्रिय सहभाग नोंदवत असून, विविध सामाजिक घटकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

डॉक्टर, उद्योजक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, युवक आणि विविध क्षेत्रातील नागरिक या अभियानाशी मोठ्या उत्साहाने जोडले जात आहेत. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून सक्रिय सहभाग घेणे ही काळाची गरज असल्याचे मत डॉ. धांडे यांनी व्यक्त केले.

यावेळी पद्मश्री चैतराम पवार यांनी वृक्षलागवड आणि जलव्यवस्थापन ही शाश्वत भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची क्षेत्रे असल्याचे सांगितले. लोकसहभाग आणि सातत्यपूर्ण जनजागृतीच्या माध्यमातूनच पर्यावरण संरक्षणाचे उद्दिष्ट साध्य होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

ही भेट प्रेरणादायी आणि सकारात्मक ठरल्याची भावना व्यक्त करत डॉ. नितीन धांडे यांनी समाजहित, पर्यावरण संरक्षण आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे 'माझे शहर माझी जबाबदारी' अभियानाला अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.