डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांच्या १८३ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांच्या १८३ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचा उपक्रम
लेवाजगत न्यूज | जळगाव : येथील डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलच्या ऑर्गनॉन ऑफ मेडिसिन विभागातर्फे होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांच्या १८३ व्या पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.३० वाजता डॉ. हॅनेमन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विद्यानंद आठवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर डॉ. पंकज शर्मा, डॉ. विपुल त्रिआहार आणि डॉ. सचिन डी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना प्राचार्य डॉ. विद्यानंद आठवले यांनी डॉ. हॅनेमन यांच्या जीवनकार्याचा, तत्त्वज्ञानाचा आणि वैद्यकीय क्षेत्रातील अमूल्य योगदानाचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांनी होमिओपॅथीच्या मूलभूत तत्त्वांशी निष्ठावान राहून वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. पंकज शर्मा यांनी आधुनिक वैद्यकीय सरावामध्ये हॅनेमन यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. विपुल त्रिआहार यांनी विद्यार्थ्यांना निरंतर अध्ययन, संशोधनवृत्ती आणि नैतिक वैद्यकीय सेवेसाठी प्रेरित केले. डॉ. सचिन डी. पाटील यांनी रुग्णांप्रती सहानुभूती, सेवाभाव आणि व्यावसायिक जबाबदारीचे महत्त्व विशद केले.
कार्यक्रमात प्रथम वर्षाचा बीएचएमएस विद्यार्थी राहुल गाडगे याने विद्यार्थ्यांच्या वतीने मनोगत व्यक्त करत डॉ. हॅनेमन यांचा वैद्यकीय वारसा जतन व वृद्धिंगत करण्याचा संकल्प व्यक्त केला. त्यानंतर डॉ. प्रतीक डी. पाटील यांनी उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना ‘हॅनेमिनियन शपथ’ दिली.
या कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच बीएचएमएसच्या सर्व वर्षांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समन्वय विभागाच्या वतीने करण्यात आले, तर भूषण वानखेडे यांनी आभार प्रदर्शन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत