बायपास, झडप बदल, जन्मजात हृदयरोग व जटिल हृदय शस्त्रक्रियांची अत्याधुनिक सुविधा आता जळगावातच
ख्यातनाम हृदय शल्यचिकित्सक डॉ. यतीन वाघ यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात नियुक्ती
बायपास, झडप बदल, जन्मजात हृदयरोग व जटिल हृदय शस्त्रक्रियांची अत्याधुनिक सुविधा आता जळगावातच
जळगाव | प्रतिनिधी :
उत्तर महाराष्ट्रातील हृदयरोग उपचार क्षेत्रासाठी महत्त्वाची घडामोड घडली असून, ख्यातनाम हृदय व रक्तवाहिनी शल्यचिकित्सक डॉ. यतीन वाघ यांनी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे सेवा सुरू केली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक तसेच परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक हृदय शस्त्रक्रिया व तज्ज्ञ उपचार स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत.
डॉ. वाघ यांनी मुंबईतील लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालयातून कार्डिओव्हॅस्क्युलर अँड थोरॅसिक सर्जरीचे उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. हृदय शस्त्रक्रिया क्षेत्रातील दीर्घ अनुभवाच्या बळावर त्यांनी विविध सुपरस्पेशालिटी रुग्णालयांमध्ये हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत.
महानगरांमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध असूनही उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना दर्जेदार हृदयरोग उपचार त्यांच्या परिसरातच मिळावेत, या उद्देशाने त्यांनी आपल्या कार्याचा विस्तार जळगावमध्ये करण्याचा निर्णय घेतला. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, आधुनिक उपकरणे आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने हृदयरोग उपचार अधिक प्रभावी करण्यासाठी ते कार्यरत राहणार आहेत.
डॉ. वाघ यांच्या कार्याची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही दखल घेण्यात आली आहे. अमेरिकेतील थोरॅसिक सर्जरी फाउंडेशनच्या "एव्हरी हार्टबीट मॅटर्स–२०२०" या उपक्रमात समन्वयक शल्यचिकित्सक म्हणून त्यांची निवड झाली होती. तसेच राष्ट्रीय आरोग्यरत्न पुरस्कार, प्राऊड महाराष्ट्रीयन पुरस्कार आदी प्रतिष्ठित सन्मानांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बायपास शस्त्रक्रिया, हृदयाच्या झडपांच्या शस्त्रक्रिया, जन्मजात हृदयरोग, महाधमनीवरील शस्त्रक्रिया तसेच इतर जटिल हृदय शस्त्रक्रिया अत्याधुनिक सुविधांसह करण्यात येणार आहेत. अनुभवी हृदयरोगतज्ज्ञ, आधुनिक कॅथलॅब, कार्डियाक आयसीयू, सुसज्ज ऑपरेशन थिएटर आणि प्रशिक्षित वैद्यकीय पथकाच्या सहाय्याने रुग्णांना सर्वसमावेशक उपचार उपलब्ध होतील.
यावेळी डॉ. यतीन वाघ म्हणाले की, "रुग्णसेवा हीच माझी सर्वोच्च जबाबदारी आहे. उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक रुग्णाला वेळेत, दर्जेदार आणि परवडणारे हृदयरोग उपचार मिळावेत, यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहीन."
गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले की, "उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना सुपरस्पेशालिटी उपचारांसाठी महानगरांकडे धाव घ्यावी लागू नये, यासाठी जळगावमध्ये सर्व अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचे आमचे ध्येय आहे. डॉ. यतीन वाघ यांच्या सहभागामुळे कार्डियाक सर्जरी विभाग अधिक सक्षम झाला असून हजारो रुग्णांना त्याचा लाभ मिळणार आहे."
डॉ. यतीन वाघ यांच्या नियुक्तीमुळे डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे उत्तर महाराष्ट्रातील हृदयरोग उपचारांचे विश्वासार्ह केंद्र म्हणून अधिक सक्षम झाले असून, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अनुभवी तज्ज्ञांच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवेची नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत