Contact Banner

डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात जीवघेण्या ‘एटोपिक प्रेग्नन्सी’वर यशस्वी शस्त्रक्रिया; २० वर्षीय महिलेचे प्राण वाचले

ectopic-pregnancy-emergency-surgery-success-dr-ulhas-patil-hospital-jalgaon


डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात जीवघेण्या ‘एटोपिक प्रेग्नन्सी’वर यशस्वी शस्त्रक्रिया; २० वर्षीय महिलेचे प्राण वाचले

लेवाजगत न्यूज जळगाव : गर्भधारणेदरम्यान उद्भवलेल्या अत्यंत गंभीर आणि जीवघेण्या एटोपिक प्रेग्नन्सीच्या प्रकरणात डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञांनी वेळेवर उपचार करून २० वर्षीय महिलेचे प्राण वाचविण्यात यश मिळवले आहे.

ममता (वय २०) या महिलेला अचानक तीव्र पोटदुखी, चक्कर येणे आणि अशक्तपणा जाणवू लागल्याने गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीत तिचा रक्तदाब अत्यंत कमी झालेला असून नाडीचे ठोके वेगाने वाढलेले आढळले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने रक्ततपासणी व सोनोग्राफी करण्यात आली.






तपासणीत गर्भाशयात गर्भ नसून तो फलोपियन नलिकेत वाढत असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान नळी फुटल्यामुळे पोटात मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. वैद्यकीय भाषेत या अवस्थेला रप्चर्ड एटोपिक प्रेग्नन्सी विथ हिमोपेरीटोनियम असे संबोधले जाते. वेळेत उपचार न झाल्यास ही स्थिती जीवघेणी ठरू शकते.

स्त्रीरोग तज्ज्ञांच्या पथकाने तातडीने लॅप्रोटोमी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रियेदरम्यान पोटात साचलेले रक्त बाहेर काढण्यात आले तसेच फुटलेल्या नळीत असलेला गर्भ सुरक्षितपणे काढून रक्तस्त्राव थांबविण्यात आला. भूलतज्ज्ञ, रक्तपेढी विभाग आणि शस्त्रक्रिया कक्षातील कर्मचाऱ्यांच्या समन्वयामुळे ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली.

शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती स्थिर असून ती उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

स्त्रीरोग तज्ज्ञांचे यशस्वी उपचार

स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ. माया आर्विकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वैभव पाटील, डॉ. प्राजक्ता पाटील आणि डॉ. ऐश्वर्या चलवदे यांनी या रुग्णावर यशस्वी उपचार केले.

डॉ. प्राजक्ता पाटील म्हणाल्या...

"एटोपिक प्रेग्नन्सी ही गर्भधारणेतील गंभीर गुंतागुंत आहे. गर्भाशयाऐवजी गर्भ नळीत वाढल्यास नळी फुटून अंतर्गत रक्तस्त्राव होऊ शकतो. पोटदुखी, चक्कर येणे, अशक्तपणा किंवा असामान्य रक्तस्त्राव यांसारखी लक्षणे दिसल्यास महिलांनी तातडीने स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. अशा रुग्णांमध्ये प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असते. या प्रकरणात वेळेवर निदान आणि तातडीची शस्त्रक्रिया झाल्यामुळे महिलेचे प्राण वाचविणे शक्य झाले."


डॉ. उल्हास पाटील रुग्णालय, जळगाव न्यूज, एटोपिक प्रेग्नन्सी, Ectopic Pregnancy, महिला आरोग्य, स्त्रीरोग तज्ज्ञ, डॉ. माया आर्विकर, डॉ. प्राजक्ता पाटील, डॉ. वैभव पाटील, डॉ. ऐश्वर्या चलवदे, Jalgaon Hospital, Emergency Surgery, Health News Marathi

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.