बांधबंदिस्ती उध्दवस्त, शेतकऱ्यांच्या अश्रूंचे बांध फुटले!हजारो एकर शेती पाण्याखाली.
बांधबंदिस्ती उध्दवस्त, शेतकऱ्यांच्या अश्रूंचे बांध फुटले!हजारो एकर शेती पाण्याखाली.
उरण : सुनिल ठाकूर -मागील पाच दिवस झालेल्या मुसळधार पावसानंतर गुरुवारी पाणी ओसरले, तेव्हा विदारक चित्र समोर आले आहे.रसायनी या ठिकाणाहून वाहत येणाऱ्या पाताळगंगा नदीच्या पुरात केळवणे खाडी किनाऱ्यावरील बांधबंदिस्ती फुटल्याने हजारो एकर शेतजमिन पाण्याखाली गेली आहे. काही ठिकाणी अडीच-तीन फूट खोलीचे खड्डे पडले आहेत.तर काही ठिकाणी तीन फुटांपर्यंत उंचीची माती जमा झाली आहे. त्यामुळे कुजलेली भाताची रोपे व नापिक झालेली शेती पाहून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर अश्रूचे बांध फुटलेले शेतकरी, असा माहोल सध्या केळवणे,पुनाडे,वशेणी परिसरात पाहायला मिळत आहे.
रायगड जिल्ह्याला जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच मुसळधार पाऊसाने झोडपून काढले होते.पनवेल तालुक्यातील केळवणे व उरण तालुक्यातील पुनाडे व वशेणी ग्रामपंचायत हद्दीत वाहत येणाऱ्या पाताळगंगा नदीच्या उसळणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात केळवणे खाडी किनाऱ्यावरील बांधबंदिस्ती फुटल्याने पुराचे पाणी दिघाटी,केळवणे, पुनाडे वशेणी परिसरात शिरल्याने अनेकांच्या घरातील जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले.त्यात या ठिकाणची संपूर्ण शेती पाण्याखाली गेल्याने पेरणी केलेली भाताची रोपे कुजली त्यामुळे शेतकरी पुरता संकटात सापडला आहे.या नैसर्गिक संकटातून शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी महसूल खात्याच्या पथकाने नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली असली तरी दुबार पेरणी साठी भाताचे बियाणे कुठून आणणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
पाताळगंगा नदीला आलेल्या पुरात केळवणे खाडी किनाऱ्यावरील बांधबंदिस्ती फुटल्याने ७० हेक्टर पेक्षा जास्त शेतजमिन पाण्याखाली गेली आहे.तसेच रहिवाशांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे.तरी शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना व रहिवाशांना लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी.तसेच फुटलेल्या बांधबंदिस्तीची खारलँड विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे नाहीतर उरलेली भातशेती नापिक होऊन अनेकांचे संसार उद्धवस्त होतील -
विश्वनाथ धर्माजी म्हात्रे शेतकरी केळवणे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत