Contact Banner

सावदा स्वामी नारायणनगरात गढूळ पाणी, अस्वच्छता व बंद पथदिव्यांमुळे नागरिक संतप्त


सावदा स्वामी नारायणनगरात गढूळ पाणी, अस्वच्छता व बंद पथदिव्यांमुळे नागरिक संतप्त

पालिकेत धडक; मुख्याधिकाऱ्यांकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा


लेवाजगत न्युज सावदा :-


सावदा शहरातील स्वामी नारायणनगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून गढूळ पाणीपुरवठा, अस्वच्छता आणि बंद पथदिव्यांच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वारंवार तक्रारी करूनही नगरपालिकेकडून आवश्यक दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी सावदा नगरपालिकेत धडक देत मुख्याधिकारी भूषण वर्मा यांची भेट घेतली. यावेळी परिसरातील मूलभूत सुविधा तातडीने सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली.


रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, नळाद्वारे येणारे पाणी अनेक दिवसांपासून गढूळ व दूषित स्वरूपाचे असून ते पिण्यासह घरगुती वापरासाठीही अयोग्य ठरत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना या समस्येचा मोठा फटका बसत असून पोटाचे विकार तसेच साथीचे आजार पसरण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली.


याशिवाय परिसरातील रस्त्यांची नियमित स्वच्छता होत नसल्याने ठिकठिकाणी घाण साचली असून डासांच्या प्रादुर्भावात वाढ झाली आहे. पावसाळ्यात ही परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याचे नागरिकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.


स्वामी नारायणनगरातील अनेक पथदिवे बंद असल्याने संपूर्ण परिसर रात्री अंधारात बुडत आहे. त्यामुळे महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना रात्रीच्या वेळी ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अंधाराचा फायदा घेऊन चोरी, अपघात अथवा इतर अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला.


या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी पालिकेत जाऊन मुख्याधिकारी भूषण वर्मा यांच्यासमोर तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी प्रभागाच्या नगरसेविका सिमरन वानखेडे यांनीही नागरिकांच्या समस्या जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. गढूळ पाणीपुरवठा, स्वच्छता आणि बंद पथदिव्यांचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी त्यांनी केली.


नागरिकांच्या समस्या त्वरित मार्गी न लावल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रहिवाशांनी दिला. दरम्यान, मुख्याधिकारी भूषण वर्मा यांनी नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत पाणीपुरवठा यंत्रणेची तातडीने तपासणी करून स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे, नियमित स्वच्छता मोहीम राबविणे तसेच बंद पथदिवे सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.