रावेर पाठोपाठ फैजपूरातही अतिक्रमणांवर हातोडा; राष्ट्रीय महामार्गालगत बुलडोझर कारवाई सुरू
रावेर पाठोपाठ फैजपूरातही अतिक्रमणांवर हातोडा; राष्ट्रीय महामार्गालगत बुलडोझर कारवाई सुरू
बुऱ्हाणपूर–अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावरील अनधिकृत अतिक्रमण हटविण्यास प्रारंभ; तीन जेसीबी, ट्रॅक्टर व कडेकोट पोलिस बंदोबस्तात पालिकेची धडक कारवाई
लेवाजगत न्युज फैजपूर :-
रावेर येथे अतिक्रमण हटाव मोहीम राबविल्यानंतर आता फैजपूर नगरपालिकेनेही अनधिकृत अतिक्रमणांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. गुरुवारी सकाळी १० वाजेपासून बुऱ्हाणपूर–अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गालगतच्या उर्वरित अनधिकृत अतिक्रमणांवर पालिकेने बुलडोझर चालवत विशेष मोहिमेला प्रारंभ केला. तीन जेसीबी, ट्रॅक्टर, पालिकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच मोठ्या पोलिस बंदोबस्तात ही कारवाई सुरू करण्यात आली.
यापूर्वी पालिकेने संबंधित अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावून स्वखर्चाने अतिक्रमण हटविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अनेक व्यापाऱ्यांनी आणि अतिक्रमणधारकांनी बुधवारीच स्वतःहून अतिक्रमण काढून प्रशासनाला सहकार्य केले. मात्र उर्वरित अनधिकृत बांधकामांवर गुरुवारी सकाळपासून जेसीबीच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली.
कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासनाचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवणे, राष्ट्रीय महामार्ग अतिक्रमणमुक्त करणे आणि सार्वजनिक जागा मोकळ्या करण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत असून, उर्वरित अतिक्रमणांवरही पुढील टप्प्यात कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून स्वेच्छेने अतिक्रमण हटवावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत