Contact Banner

नाशिक धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला जामीन; गर्भातील बाळाच्या हिताचा न्यायालयाचा विचार

 

नाशिक धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला जामीन; गर्भातील बाळाच्या हिताचा न्यायालयाचा विचार

लेवाजगत न्युज नाशिक :- नाशिक रोड येथील विशेष न्यायालयाने धर्मांतरासाठी दबाव, धार्मिक भावना दुखावणे तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपी निदा एजाज खान हिला जामीन मंजूर केला आहे.

न्यायालयाने नमूद केले की, तपासातील कागदपत्रांवरून निदा खानची भूमिका प्रथमदर्शनी दिसून येते. मात्र, आरोपांची सत्यता खटल्यादरम्यान तपासली जाणार असून जामीनाच्या टप्प्यावर पुराव्यांची सविस्तर छाननी करणे आवश्यक नाही. तपास पूर्ण झाला असून दोषारोपपत्रही दाखल करण्यात आल्याची नोंद न्यायालयाने घेतली.




निदा खान पाच महिन्यांची गर्भवती असल्याची बाब न्यायालयाने विशेषत्वाने विचारात घेतली. जन्माला येणाऱ्या बाळाच्या हिताचा विचार करणे आवश्यक असल्याचे सांगत, कारागृहातील परिस्थितीचा नवजात बाळावर परिणाम होऊ नये यासाठी न्यायालयीन विवेकाधिकार वापरणे योग्य असल्याचे न्यायालयाने म्हटले.

आदेशात न्यायालयाने नमूद केले की, “भगवान श्रीकृष्णाप्रमाणे तुरुंगात जन्म घेण्याचा आघात किंवा त्यासंबंधीचा सामाजिक कलंक कोणालाही सहन होण्यासारखा नाही.” त्यामुळे जन्माला येणाऱ्या बाळाच्या सर्वांगीण हितासाठी आरोपीच्या बाजूने विवेकाधिकार वापरणे न्याय्य असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले.

तसेच निदा खानकडून कोणतीही जप्ती बाकी नसणे, सरकारी पक्षाने पुढील कोठडीची मागणी न करणे आणि खटल्याच्या सुनावणीला वेळ लागण्याची शक्यता या बाबींचाही न्यायालयाने विचार केला. योग्य अटी घालून अभियोजन पक्षाच्या हिताचे संरक्षण करता येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरातील नारेगाव परिसरातून ताब्यात घेण्यात आले होते. ती 25 मार्चपासून फरार असल्याचे सांगण्यात आले होते. अटकपूर्व जामिनासाठी तिचा अर्ज 2 मे 2026 रोजी फेटाळण्यात आला होता.

छत्रपती संभाजीनगर पोलीस आणि नाशिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत 7 मे रोजी रात्री निदा खानला ताब्यात घेतले होते. तिची आरोग्य तपासणी करून न्यायालयात हजर करण्यात आले होते.

या प्रकरणात छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्याविरोधातही गुन्हेगारांना आश्रय दिल्याच्या आरोपावरून भारतीय न्याय संहिता कलम 249 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.