Contact Banner

गारबर्डी धरण परिसरातील दीड लाखांच्या चोरीप्रकरणी तिघांना अटक; पोलिसांची जलद कारवाई, रोख रकमेचा शोध सुरू

 

garbardi-dam-theft-case-three-accused-arrested-savda-police

गारबर्डी धरण परिसरातील दीड लाखांच्या चोरीप्रकरणी तिघांना अटक; पोलिसांची जलद कारवाई, रोख रकमेचा शोध सुरू

सावदा लेवाजगत न्यूज प्रतिनिधी-

सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गारबर्डी धरण तालुका रावेर जिल्हा जळगाव परिसरात पर्यटकाच्या कारमधून दीड लाख रुपयांची रोकड, पाकीट आणि इतर साहित्य चोरी करणाऱ्या तिघा आरोपींना सावदा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत अटक केली आहे. आरोपींकडून फिर्यादीचे पाकीट, आधार कार्ड, पॅन कार्ड, एटीएम कार्ड, आरसी बुकसह महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली असून, चोरीस गेलेल्या दीड लाख रुपयांच्या रोख रकमेचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.





या प्रकरणातील फिर्यादी शेख समीर शेख दगडू (वय २५, रा. खडका चौफुली, उस्मानिया मशिदीसमोर, भुसावळ) हे पर्यटक वाहन चालक असून, १९ जुलै रोजी दुपारी मित्र-मैत्रिणींसह इको कारने (क्र. MH-02-CH-8499) गारबर्डी धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. वाहनाचा हप्ता भरण्यासाठी जमा केलेली सुमारे १ लाख ५० हजार रुपयांची रोकड त्यांनी पाकिटासह एका सॅकमध्ये ठेवून ती कारच्या डिक्कीत ठेवली होती. तसेच सोबतच्या मित्र-मैत्रिणींच्या पर्स आणि इतर साहित्यही वाहनात ठेवण्यात आले होते.

फिरण्यासाठी धरण परिसरात गेल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी कारच्या डिक्कीला लॉक नसल्याचा फायदा घेत डिक्की उघडली आणि रोकड, पाकीट तसेच इतर साहित्य असलेली सॅक व पर्स चोरून नेल्या. या दरम्यान कारजवळ २५ ते ३५ वयोगटातील तीन संशयित इसम फिरत असल्याचे फिर्यादीच्या निदर्शनास आले होते. या माहितीच्या आधारे सावदा पोलीस ठाण्यात २० जुलै रोजी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०३(२) अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सावदा पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून फिर्यादीने दिलेल्या वर्णनाच्या आधारे गुप्त बातमीदारांच्या मदतीने संशयितांचा शोध सुरू केला. तपासादरम्यान गारबर्डी धरण परिसरात वर्णनाशी मिळतेजुळते तीन इसम आढळून आले. फिर्यादीने त्यांची ओळख पटविल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत पंचांसमक्ष झडती घेतली.

झडतीदरम्यान शरीफ वजीर तडवी याच्या पँटच्या खिशातून फिर्यादीचे चोरीला गेलेले पाकीट तसेच त्यातील आधार कार्ड, पॅन कार्ड, एटीएम कार्ड, आरसी बुक आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली. त्यानंतर तिघांकडे चोरीस गेलेल्या रोख रकमेबाबत चौकशी करण्यात आली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी चोरीची कबुली दिली.

या प्रकरणी राजू रज्जाक तडवी (वय ३१, रा. खिरोदा, ता. रावेर), शरीफ वजीर तडवी (वय २५, रा. चिचाटी, ता. रावेर) आणि अकिल उस्मान तडवी (वय ३१, रा. लोहारा, ता. रावेर) यांना अटक करण्यात आली. आरोपींना २१ जुलै रोजी रावेर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

पोलीस कोठडीदरम्यान आरोपींच्या सांगण्यावरून चोरीतील रिकामी सॅक आणि एक लेडीज पर्स जप्त करण्यात आली आहे. मात्र चोरीस गेलेल्या दीड लाख रुपयांच्या रोख रकमेची आरोपींनी कुठे विल्हेवाट लावली, याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून, आणखी मुद्देमाल हस्तगत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या कारवाईत सहाय्यक फौजदार जयराम खोडपे, विनोद पाटील, अतुल तडवी, मेहरबान तडवी, निलेश बाविस्कर, उमेश पाटील, मोहसिन पठाण, राजेश बोदडे, सुनील सैंदाणे, संजय तडवी, बबन तडवी, मयूर पाटील, राहुल येवले, सुनील कुरकुरे, राकेश झोपे आणि चालक नामदेव कापडे यांनी सहभाग घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.