Contact Banner

हतनूर धरणातून विसर्गात मोठी वाढ होण्याची शक्यता; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केली प्रत्यक्ष पाहणी, तापी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

 

hatnur-dam-flood-alert-discharge-likely-to-rise-district-collector-rohan-ghuge-inspects-dam-july-31-2026

हतनूर धरणातून विसर्गात मोठी वाढ होण्याची शक्यता; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केली प्रत्यक्ष पाहणी, तापी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

जळगाव लेवाजगत न्यूज प्रतिनिधी-

हतनूर धरण परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याची आवक लक्षणीयरीत्या वाढली असून तापी नदीपात्रात विसर्ग वाढविण्याची तयारी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आज हतनूर धरण परिसराला भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.






31 जुलै 2026 रोजी सकाळी 10:40 वाजेपर्यंत, हतनूर धरणाच्या 41 पैकी 4 गेट पूर्णपणे उघडण्यात आली असून 32 गेट दोन मीटरने उघडण्यात आली आहेत. सध्या धरणातून 1,85,828 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार, धरणातील वाढत्या पाण्याच्या आवकेमुळे पुढील काही तासांत विसर्ग 3,50,000 ते 3,75,000 क्यूसेक इतका वाढविण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापी नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, नदीपात्रात जाणे टाळावे तसेच जनावरे व मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी धरणातील पाण्याची पातळी, सुरू असलेला विसर्ग आणि संभाव्य पूरस्थितीचा आढावा घेतला. तसेच पाटबंधारे विभाग, महसूल प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. नदीकाठच्या गावांमध्ये आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग तसेच जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले असून, कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधण्याचे सांगितले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.