Contact Banner

जळगावच्या जागृत नवसाचा गणपती मंदिरात संकष्टी चतुर्थीनिमित्त भक्तिरसात न्हालेली भजन संध्या

 

jalgaon-sankashti-chaturthi-bhajan-at-jagrut-navasacha-ganpati-temple

जळगावच्या जागृत नवसाचा गणपती मंदिरात संकष्टी चतुर्थीनिमित्त भक्तिरसात न्हालेली भजन संध्या

जळगाव | प्रतिनिधी-

जळगाव शहरातील बजरंग बोगद्याजवळील प्रसिद्ध 'जागृत नवसाचा गणपती मंदिरात' संकष्टी चतुर्थीच्या पावन पर्वानिमित्त गुरुवारी (३ जुलै) सायंकाळी भक्तिमय वातावरणात विशेष भजन संध्याचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी ७.१५ ते रात्री ९.०० या वेळेत पार पडलेल्या या कार्यक्रमाला गणेशभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.






या भक्तिमय सोहळ्यात विशेष निमंत्रित गायिका वृंदा पाखले यांच्यासह तुषार वाघुळदे, गुलाब कापडणे, प्रवीण पाटील, विनायक काळे आणि संयुक्ता बयाणी यांनी विविध भक्तिगीते, अभंग आणि गणेशभजने सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

प्रसिद्ध "भक्तीनाद" भजनी मंडळाने एकापेक्षा एक सरस भजने आणि अभंग सादर करत संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसात रंगवला. "गणपती बाप्पा मोरया"च्या जयघोषात आणि टाळ्यांच्या कडकडाटात भजन संध्या अधिकच रंगतदार झाली.

भजन कार्यक्रमानंतर भाविकांनी श्री गणेशाचे दर्शन घेत प्रसादाचा लाभ घेतला. हलकासा पाऊस सुरू असतानाही भक्तांचा उत्साह कायम राहिला. भजनाच्या सुरावटींवर अनेक भाविक तल्लीन झाले होते. महिलांसह अबालवृद्धांची उपस्थिती विशेष लक्षणीय होती.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिराचे श्री. व्ही. झेड. (बापू) पाटील, साहित्यिक ज्ञानेश मोरे तसेच महाराष्ट्र मंदिर महासंघाचे हितेंद्र धांडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व कलावंतांचा श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

भक्ती, संगीत आणि श्रद्धेचा सुंदर संगम घडविणाऱ्या या भजन संध्येमुळे उपस्थित भाविकांना अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभव लाभला. संकष्टी चतुर्थीचा हा सोहळा आनंद, उत्साह आणि भक्तिभावाने संपन्न झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.