Contact Banner

आक्षेपार्ह व गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्या रील्सविरोधात जळगाव पोलिसांची विशेष सायबर मोहीम



आक्षेपार्ह व गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्या रील्सविरोधात जळगाव पोलिसांची विशेष सायबर मोहीम

जळगाव | प्रतिनिधी

सोशल मीडियावर गुन्हेगारीचे उदात्तीकरण, धोकादायक स्टंटबाजी तसेच महिलांचा अवमान करणारी सामग्री प्रसारित करणाऱ्यांविरोधात जळगाव पोलिसांनी विशेष सायबर पॅट्रोलिंग मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील संशयास्पद रील्स आणि पोस्टची तपासणी करून संबंधित व्यक्तींना समुपदेशनासाठी पोलिस मुख्यालयात बोलाविण्याची कारवाई करण्यात येत आहे.

अलीकडच्या काळात प्रसिद्धी मिळविण्याच्या उद्देशाने काही युवकांकडून गुन्हेगारांचे गौरवीकरण करणारे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करत जीव धोक्यात घालणारे स्टंट दाखविणारे तसेच महिलांविषयी आक्षेपार्ह आशय असलेले व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. अशा सामग्रीचा समाजावर, विशेषतः तरुण पिढीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही मोहीम राबविण्यात येत आहे.




सायबर पॅट्रोलिंगदरम्यान आक्षेपार्ह आशयाची नोंद घेऊन संबंधितांची ओळख पटविली जात असून त्यांना कायद्याची माहिती देत सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. पोलिसांचा भर केवळ कारवाईवर नसून जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपायांवरही आहे.

पोलिस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, सोशल मीडियाचा वापर करताना कायद्याचे पालन करावे, गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारी किंवा समाजात चुकीचा संदेश देणारी कोणतीही सामग्री प्रसारित करू नये. सुरक्षित, सकारात्मक आणि जबाबदार डिजिटल वातावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करणे आवश्यक असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.