पाचोऱ्यात भीषण कार अपघात; जळगाव चौफुलीवरील २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू
पाचोऱ्यात भीषण कार अपघात; जळगाव चौफुलीवरील २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू
लेवाजगत न्युज पाचोरा (प्रतिनिधी): भडगाव रोडवरील अरिहंत ऑटोमोबाईल समोर मध्यरात्री झालेल्या एका भीषण कार अपघातात जळगाव चौफुली येथील २२ वर्षीय तरुण चेतन सुकदेव हटकर याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे दोन मित्र जखमी झाले असून दोन सुखरूप आहेत. ही घटना मंगळवारी (दि. ७ जुलै २०२६) मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात मयताचे वडील सुकदेव पुंडलिक हटकर यांनी खबर दिली असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव चौफुली परिसरातील रहिवासी असलेले सुकदेव हटकर हे हमालीचे काम करतात, तर त्यांची मुले चायनीजचे दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सोमवार, दि. ६ जुलै रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास चेतन हा चायनीज दुकानाचे काम संपवून आपली परिवारातील सदस्य लक्ष्मी हिला घरी सोडून मित्रांसोबत बाहेर गेला होता. त्यानंतर मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास भडगाव रोडवरील अरिहंत ऑटोमोबाईल समोर त्यांच्या कारला भीषण अपघात झाला.
अपघाताची माहिती मिळताच वडील सुकदेव हटकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेथे हुंदाई आयटेन कार (क्रमांक एमएच ०३ एडब्लू ९१०७) अपघातग्रस्त अवस्थेत आढळून आली. कारच्या डाव्या बाजूचे नुकसान झाले होते, तर मागील बाजूचा उजवा टायर फुटलेला होता. रस्त्याशेजारील एका निंबाच्या झाडाला कारची जोरदार धडक बसल्याचे घटनास्थळावरून स्पष्ट होत होते. अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या चेतनला तातडीने पाचोरा येथील विघ्नहर्ता हॉस्पिटल आणि त्यानंतर श्रीराम क्रिटिकल केअर येथे नेण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्याला जळगाव येथे हलवण्याचा सल्ला दिला. जळगाव येथील न्यूक्लेस केअर सेंटरमध्ये नेले असता, डॉक्टरांनी तपासणी अंती चेतनला मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे हटकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या सूचनेवरून पोलीस हवालदार राहुल शिंपी आणि होमगार्ड कपिल पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मयताचे शवविच्छेदन पाचोरा ग्रामीण रुग्णालयात करण्यात येणार असून, हा अपघात नेमका कसा आणि कोणत्या परिस्थितीमध्ये झाला, याचा अधिकृत तपास पाचोरा पोलीस करत आहेत.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत