‘पीएमआरडीए’ची संकटमोचक टीम; अतिवृष्टीत शेकडो नागरिकांना दिलासा
‘पीएमआरडीए’ची संकटमोचक टीम; अतिवृष्टीत शेकडो नागरिकांना दिलासा
लेवाजगत न्यूज पुणे : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती, पाणी साचणे, भूस्खलन आणि विविध आपत्कालीन घटना घडत असताना पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अग्निशमन दल व पुणे महानगर आपत्ती प्रतिसाद पथकाने (पीडीआरएफ) युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले आहे. गेल्या २४ तासांत लोणावळा, मावळ, खेड, लोहगाव, लोणी काळभोर आदी भागांत अडकलेल्या शेकडो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून, काही ठिकाणी शोध व बचाव मोहिमा अद्याप सुरू आहेत.
अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पीएमआरडीएची संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. पूरग्रस्त भागांत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढणे, भूस्खलनाच्या घटनांमध्ये शोधकार्य करणे तसेच तातडीची मदत पोहोचविणे, अशा विविध कारवाया सुरू आहेत.
लोणावळ्यातील ग्रीन लँड व्हिला येथे पाण्यात अडकलेल्या दोन ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. कार्ले येथील माऊंट वेस्ट क्रिस्टा सोसायटीमध्ये पाण्याने वेढलेल्या २१ नागरिकांची लाइफ जॅकेट, लाइफ रिंग आणि दोरांच्या साहाय्याने सुखरूप सुटका करण्यात आली. इंडियन ऑईल पेट्रोल पंप परिसरात अडकलेल्या तीन नागरिकांनाही बचाव पथकाने सुरक्षित बाहेर काढले.
लोहगाव येथील आदर्श नगर परिसरात पाण्यात अडकलेल्या प्रवासी बसमधील १० ते १२ प्रवाशांना वाचविण्यात आले. मळवली येथील सूर्य व्हिला परिसरात पाण्याने वेढलेल्या २० नागरिकांसह एका पाळीव कुत्र्यालाही सुरक्षितस्थळी पोहोचविण्यात आले. मळवली-बोरज रोडवरील अंकित ग्रुप सोसायटीमध्ये अडकलेल्या १५ नागरिकांची, तर वाकसाई येथील वालोसिटी व्हिला, मँगो व्हिला आणि ओरिकल व्हिला परिसरातील ३४ नागरिकांचीही सुरक्षित सुटका करण्यात आली.
खेड तालुक्यातील रेटवडी येथे पाण्यात बुडालेल्या व्यक्तीच्या शोधासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहे. शेलू येथे बुडालेल्या एका व्यक्तीला बाहेर काढण्यात आले. लोणावळ्यातील नॉर्थ पॉईंट आणि श्री सिक्स्टी रिसॉर्ट परिसरात भूस्खलनानंतर काही व्यक्ती अडकल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याने तेथेही शोध व बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे.
घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम असल्याने पीएमआरडीएने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणातील पाणीसाठा वेगाने वाढत असून, आवश्यकतेनुसार पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नदीपात्रात अथवा नदीकाठी जाणे टाळावे, सखल भागातील रहिवाशांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे आणि अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, “अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पीएमआरडीएचे अग्निशमन दल आणि पीडीआरएफचे अधिकारी व जवान अत्यंत तत्परतेने व समन्वयाने कार्यरत आहेत. नागरिकांच्या जीविताचे संरक्षण हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य असून, प्रत्येक आपत्कालीन घटनेला तातडीने प्रतिसाद देण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून बचाव पथकांना सहकार्य करावे.”
पीएमआरडीएच्या बचाव पथकांकडून मावळ-लोणावळा परिसरासह विविध भागांत मोठ्या प्रमाणावर मदत व बचावकार्य सुरू असल्याची माहितीही समोर आली आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत