जळगाव पोलीस दलातर्फे पत्रकारांसाठी 'विश्वासाची लेन्स' छायाचित्र स्पर्धेचे आयोजन
जळगाव पोलीस दलातर्फे पत्रकारांसाठी 'विश्वासाची लेन्स' छायाचित्र स्पर्धेचे आयोजन
१९ ऑगस्ट जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त उपक्रम; १२ ऑगस्टपर्यंत प्रवेशिका स्वीकारणार
जळगाव | प्रतिनिधी
जागतिक फोटोग्राफी दिन (१९ ऑगस्ट) निमित्त जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पत्रकारांसाठी "विश्वासाची लेन्स : पोलीस–पत्रकार-जनता भागीदारी छायाचित्र स्पर्धा" आयोजित करण्यात आली आहे. पोलीस, पत्रकार आणि नागरिक यांच्यातील विश्वास, सहकार्य आणि सकारात्मक संवाद अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रशासनाने दिली.
छायाचित्र हे केवळ एक चित्र नसून समाजातील वास्तव, भावना, संघर्ष, सेवा, कर्तव्य आणि प्रेरणा यांचे प्रभावी दस्तऐवजीकरण असते. पत्रकार आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून समाजातील महत्त्वाच्या घटनांचे क्षण टिपून त्यांना इतिहासात जतन करतात. त्यांच्या या योगदानाचा गौरव करण्याबरोबरच समाजाला सकारात्मक संदेश देणाऱ्या छायाचित्रांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे.
स्पर्धेसाठी सात गट निश्चित करण्यात आले असून त्यामध्ये पोलीस जनसेवेत (Police in Public Service), गुन्हे विषयक (Crime Photography), सामाजिक (Social Photography), वाहतूक (Traffic Photography), जळगाव वारसा (Jalgaon Heritage), क्रीडा (Sports Photography) आणि महिला सक्षमीकरण (Women Empowerment) या श्रेणींचा समावेश आहे.
स्पर्धेसाठी छायाचित्रे पाठविण्याची अंतिम मुदत १२ ऑगस्ट २०२६ असून, प्रवेशिका व्हॉट्सअॅप क्रमांक ९७०२२ ००३१५ वर पाठवाव्यात. प्राप्त छायाचित्रांचे मोठ्या आकारात प्रदर्शन करण्यात येणार असून हे प्रदर्शन १५ ऑगस्ट रोजी पद्मालय हॉल, पोलीस मुख्यालय, जळगाव येथे आयोजित केले जाईल.
प्रत्येक सातही गटांमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशा तीन पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असून, मान्यवर मंत्री यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
स्पर्धेत सहभागी होताना पत्रकारांनी पूर्ण नाव, न्यूज चॅनेल/दैनिक/साप्ताहिक/डिजिटल मीडिया संस्थेचे नाव, मोबाईल क्रमांक तसेच छायाचित्र कोणत्या श्रेणीत सादर केले आहे याची स्पष्ट नोंद करणे आवश्यक आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक, जळगाव यांनी सर्व पत्रकारांना या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले असून, आपल्या छायाचित्रांमधून समाजातील सकारात्मकता, लोकसहभाग आणि सेवाभावाचे प्रभावी दर्शन घडवावे, असे आवाहन केले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत