Contact Banner

रूममेटची गळा दाबून हत्या; पुरावा लपवण्यासाठी पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून फेकला, पती-पत्नी अटकेत

 

roommate-murder-in-shikrapur-wife-helped-hide-body-in-sack-husband-wife-arrested

रूममेटची गळा दाबून हत्या; पुरावा लपवण्यासाठी पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून फेकला, पती-पत्नी अटकेत






पुणे | प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथे एक धक्कादायक हत्याकांड उघडकीस आले आहे. एकाच खोलीत राहणाऱ्या मित्रानेच आपल्या रूममेटचा गळा दाबून खून केल्याचा आरोप असून, पुरावा नष्ट करण्यासाठी पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून निर्जन ठिकाणी फेकल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी अवघ्या काही तासांत तपास पूर्ण करत पती-पत्नीला अटक केली आहे.

२६ जुलै रोजी दुपारी करंजेनगर येथील मोकळ्या मैदानातील झुडपांमध्ये पोत्यात भरलेला एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. सोशल मीडिया आणि गुप्त माहितीच्या आधारे मृताची ओळख गौरव ऊर्फ अक्षय अशोक वायकर (वय २४, रा. थेऊर, ता. हवेली) अशी पटली.

तपासादरम्यान गौरव हा करंजेनगर येथे त्याचा मित्र मुकेश विठ्ठल सोनवणे आणि मुकेशची पत्नी जान्हवी अनिल पाटोळे (वय १९) यांच्यासोबत राहत असल्याचे समोर आले. पोलिसांच्या माहितीनुसार, गौरव आणि मुकेश यांच्यात संशयातून वारंवार वाद होत होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मुकेश आणि जान्हवी यांची चौकशी केली असता हत्येचा उलगडा झाला.

मृत गौरवची आई कांचन अशोक वायकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मुकेश विठ्ठल सोनवणे व जान्हवी अनिल पाटोळे या दोघांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.