Contact Banner

जळगाव जिल्ह्यात 14 ते 28 जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश; विनापरवानगी सभा, जमाव आणि मिरवणुकांवर बंदी


jalgaon-section-37-prohibitory-orders-14-to-28-july-2026


जळगाव जिल्ह्यात 14 ते 28 जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश; विनापरवानगी सभा, जमाव आणि मिरवणुकांवर बंदी

लेवा जगत न्यूज | जळगाव-

जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आणि सार्वजनिक शांतता अबाधित ठेवण्यासाठी 14 जुलै ते 28 जुलै 2026 या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. मुंबई पोलीस अधिनियम, 1951 च्या कलम 37 (1) व (3) अंतर्गत हे आदेश लागू करण्यात आले असून, या कालावधीत पाच किंवा अधिक व्यक्तींचा जमाव, तसेच पोलीस अधीक्षकांच्या पूर्वपरवानगीशिवाय सभा किंवा मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आगामी काळात विविध सण-उत्सव, जयंती, पुण्यतिथी कार्यक्रम आणि 25 जुलै रोजी होणारी आषाढी एकादशी यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धार्मिक व सामाजिक कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. संभाव्य गर्दी लक्षात घेऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.






या आदेशानुसार तलवारी, भाले, बंदुका, सुरे, लाठ्या, काठ्या किंवा इजा पोहोचवू शकणारी कोणतीही हत्यारे बाळगण्यास बंदी राहील. तसेच स्फोटक किंवा ज्वलनशील पदार्थ बाळगणे, दगड किंवा फेकण्यायोग्य वस्तू जमा करणे अथवा सोबत ठेवणे यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.

याशिवाय कोणत्याही व्यक्तीच्या प्रतीकात्मक प्रेताचे प्रदर्शन किंवा दहन, सार्वजनिकरीत्या आक्षेपार्ह घोषणा, विक्षिप्त हावभाव तसेच शांतता व सुव्यवस्थेला बाधा पोहोचवणारे फलक, चित्रे किंवा घोषणाबाजी करण्यासही मनाई करण्यात आली आहे.

मात्र, वृद्ध किंवा दिव्यांग व्यक्ती, ज्यांना चालण्यासाठी काठीचा आधार आवश्यक आहे, त्यांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. तसेच शासकीय कार्यक्रम, प्रेतयात्रा, विवाह मिरवणुका, धार्मिक मिरवणुका आणि कर्तव्य बजावणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांनाही या आदेशातून वगळण्यात आले आहे.

हे आदेश 14 जुलै 2026 रोजी रात्री 12.01 वाजल्यापासून 28 जुलै 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत लागू राहतील, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.