Contact Banner

१,३५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट व रेनकोट; शिखर यूथ फाउंडेशनचा प्रेरणादायी उपक्रम

 

shikhar-youth-foundation-distributes-1350-education-kits-and-raincoats-to-palghar-students

१,३५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट व रेनकोट; शिखर यूथ फाउंडेशनचा प्रेरणादायी उपक्रम

पालघर | प्रतिनिधी

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शिखर यूथ फाउंडेशनच्या वतीने पालघर जिल्ह्यातील २५ जिल्हा परिषद शाळांमधील १,३५० गरजू आणि वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट व रेनकोटचे वितरण करण्यात आले. रविवार (१२ जुलै) रोजी झालेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

उपक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद शाळा, सोमटे येथे झाली. त्यानंतर नानिवली आश्रम शाळा आणि नागझरी जिल्हा परिषद शाळेत वितरण कार्यक्रम पार पडला. या मोहिमेत विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षासाठी आवश्यक वह्या, लेखनसाहित्य तसेच पावसाळ्यात सुरक्षितपणे शाळेत ये-जा करता यावी यासाठी रेनकोट देण्यात आले.






यावेळी विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणाचे महत्त्व पटवून देत आत्मविश्वासाने मोठी स्वप्ने पाहण्याचे आवाहन करण्यात आले. शैक्षणिक साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि पालकांनी व्यक्त केलेले समाधान हा उपक्रमाचा विशेष ठरला.

हा उपक्रम समाजातील दानशूर व्यक्ती, स्वयंसेवक, हितचिंतक तसेच रोटरी क्लब ऑफ बॉम्बे पोवई यांच्या सहकार्याने यशस्वी झाला. त्यांच्या योगदानामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध होऊन त्यांच्या शिक्षणाला बळ मिळाले.

शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि समाजकल्याण क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या शिखर यूथ फाउंडेशनने भविष्यातही गरजू व वंचित घटकांसाठी अशाच लोकहिताच्या उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार व्यक्त केला. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी संस्थेचे हे कार्य प्रेरणादायी असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.