Contact Banner

गुन्हा घडण्यापूर्वीच जामनेर पोलिसांची धडक कारवाई; ३२ इंची तलवारीसह संशयित अटकेत

 


गुन्हा घडण्यापूर्वीच जामनेर पोलिसांची धडक कारवाई; ३२ इंची तलवारीसह संशयित अटकेत

लेवाजगत न्यूज | जामनेर (नितीन इंगळे):-

जामनेर शहरात संभाव्य गंभीर गुन्हा रोखण्यात जामनेर पोलिसांना यश आले आहे. गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी ३२ इंच लांबीची धारदार तलवार बाळगून फिरणाऱ्या एका संशयिताला ताब्यात घेतले. आरोपीकडून तलवार जप्त करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम, १९५९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजता जुना बोदवड नाका परिसरात एक व्यक्ती धारदार तलवार घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांना मिळाली. त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तातडीने परिसरात शोधमोहीम राबवली.

कारवाईदरम्यान पोलिसांनी संशयिताला तलवारीसह ताब्यात घेतले. चौकशीत त्याची ओळख भिकन किसन घिसाडी (वय ४२), रा. गोविंद महाराज झोपडपट्टी, जामनेर अशी पटली.

झडतीदरम्यान आरोपीकडून स्टीलच्या पात्याची, टोकदार मूठ असलेली ३२ इंची धारदार तलवार जप्त करण्यात आली. संबंधित व्यक्तीकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाल्याने जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२८/२०२६ नोंदविण्यात आला आहे. भारतीय शस्त्र अधिनियम, १९५९ च्या कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.




या प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन महाजन यांनी फिर्याद दिली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. कारवाईत सहाय्यक फौजदार साहिल तडवी तसेच पोलीस कर्मचारी प्रताप मथुरे, सचिन महाजन, राजेश लहासे आणि गजानन माळी यांनी सहभाग घेतला.

जामनेर शहरातील अवैध शस्त्रधारक आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध पोलिसांची कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.