Contact Banner

रावेरात दरोड्याचा कट उधळला; तलवार, टॉमी, मिरची पूड व ३ लाखांच्या बनावट 'चिल्ड्रन बँक' नोटांसह दोघे जेरबंद

raver-police-foil-robbery-plot-two-arrested-with-weapons-fake-children-bank-notes


रावेरात दरोड्याचा कट उधळला; तलवार, टॉमी, मिरची पूड व ३ लाखांच्या बनावट 'चिल्ड्रन बँक' नोटांसह दोघे जेरबंद

रावेर |लेवाजगत न्यूज प्रतिनिधी-

रावेर शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा मोठा कट रावेर पोलिसांनी वेळेवर उधळून लावला. पोलिसांनी कारवाई करत दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या वाहनातून तलवार, टॉमी, मिरची पूड, दोरखंड, पेचस तसेच सुमारे ३ लाख रुपयांच्या 'चिल्ड्रन बँक'च्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणातील अन्य तीन संशयित अंधाराचा व शेतशिवाराचा फायदा घेत पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.






पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाल गावातून एक पांढऱ्या रंगाची ईको कार संशयास्पदरीत्या रावेरच्या दिशेने जात असल्याची गुप्त माहिती पोलिस हेड कॉन्स्टेबल ईश्वर चव्हाण यांना मिळाली. त्यांनी ही माहिती वरिष्ठांना कळवताच पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी तातडीने गुन्हे शोध पथकाला सतर्क केले.

आभोडा गावाजवळ संशयित वाहन पोलिसांच्या नजरेस पडले. पोलिसांचा पाठलाग सुरू होताच चालकाने भरधाव वेगाने कार पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र बऱ्हाणपूर रस्त्यावरील एका शेताजवळ वाहन चिखलात अडकल्याने संशयितांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी परिसरातील नागरिकांनीही त्यांचा पाठलाग केला. तीन जण पसार होण्यात यशस्वी झाले, तर दोन संशयितांना नागरिकांनी पकडले. पोलिस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी जमावाने त्यांना मारहाण केली होती. पोलिसांनी हस्तक्षेप करून दोघांना ताब्यात घेत रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

यानंतर वाहनाची झडती घेतली असता त्यातून लोखंडी तलवार, टॉमी, पेचस, लाल मिरची पूड, दोरखंड, ५०० रुपयांच्या दर्शनी मूल्याच्या सुमारे ३ लाख रुपयांच्या 'चिल्ड्रन बँक'च्या बनावट नोटा तसेच ईको कार (क्रमांक एमएच-०४-ईए-२४०३) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

प्राथमिक तपासात संशयित रावेर शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात निखिल प्रवीण पाटील व अल्ताफ जलाल शेख (वय २६, दोघे रा. साईनगर, घोडबंदर रोड, कासारवडवली, जि. ठाणे) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर मेहरबान जहांगीर तडवी (रा. पाल) व त्याचे दोन साथीदार फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावीत आणि फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोलिस उपनिरीक्षक मनोज महाजन, तुषार पाटील तसेच गुन्हे शोध पथकाने केली.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.