खडकवासला धरणाबाबत सावधानतेचा इशारा; पुढील २४ तासांत विसर्गाची शक्यता
खडकवासला धरणाबाबत सावधानतेचा इशारा; पुढील २४ तासांत विसर्गाची शक्यता
लेवाजगत न्यूज पुणे, दि. ६ जुलै २०२६ : खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून, धरणातील पाणीसाठा सुमारे ३२ टक्क्यांवर पोहोचला आहे. पावसाचा वाढता जोर आणि धरणात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह लक्षात घेता, पुढील २४ तासांत धरण ८० टक्के किंवा त्याहून अधिक क्षमतेने भरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
परिस्थितीनुसार खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून कोणत्याही वेळी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येऊ शकतो. त्यामुळे नदीपात्रालगतच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
नदीपात्रात कोणीही उतरू नये, तसेच नदीपात्रातील जनावरे, साहित्य आणि इतर वस्तू तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सखल भागातील नागरिकांनी विशेष खबरदारी घेऊन अधिकृत सूचनांचे काटेकोर पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
पाटबंधारे विभागास सहकार्य करून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवरच भरोसा ठेवावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी, निरा देवघर प्रकल्प व्यवस्थापन उपविभाग तथा मालमत्ता व्यवस्थापन उपविभाग, पुणे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत