Contact Banner

प्रेमीयुगुलाची आत्महत्या; धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील घटना

 

love-couple-dies-by-suicide-after-consuming-poison-in-dhule-sakri

प्रेमीयुगुलाची आत्महत्या; धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील घटना

धुळे | प्रतिनिधी





धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील कढरे शिवारात मजुरीसाठी आलेल्या एका प्रेमीयुगुलाने विषारी पदार्थ प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

मृतांमध्ये किरण सुभाष वाघ (वय २३) आणि वैशाली भिमसिंग पवार (वय १९, दोघेही रा. आमोदे, ता. शहादा, जि. नंदुरबार) यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किरण हा विवाहित असून त्याला तीन वर्षांचा मुलगा आहे. मात्र, किरण आणि वैशाली यांच्यात प्रेमसंबंध असल्याने दोघे गेल्या महिन्यात घरातून निघून गेले होते. याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात दोघे हरवल्याची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर दोघे साक्री तालुक्यातील कढरे येथे एका शेतकऱ्याकडे मजूर म्हणून काम करत होते.

दरम्यान, आत्महत्येपूर्वी किरणने आपल्या वडिलांना व्हिडिओ कॉल करून, "आम्ही जगण्याला कंटाळलोय, माफ करा," असे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर संपर्क तुटला.

गुरुवारी सायंकाळी कढरे शिवारातील बळीराम चव्हाण यांच्या शेतात दोघे गंभीर अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने जैताणे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच निजामपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.