Contact Banner

विवाह नोंदणी प्रमाणपत्रावर QR कोडची सुविधा सुरू करा शिवसेना शहरप्रमुख सूरज परदेशी यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

 

marriage-certificate-qr-code-facility-demand-suraj-pardeshi-savda

विवाह नोंदणी प्रमाणपत्रावर QR कोडची सुविधा सुरू करा

शिवसेना शहरप्रमुख सूरज परदेशी यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

सावदा लेवाजगत न्यूज प्रतिनिधी : सावदा उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयामार्फत देण्यात येणाऱ्या विवाह नोंदणी प्रमाणपत्रावर QR कोडची सुविधा सुरू करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक सूरज परदेशी यांनी केली आहे. याबाबत त्यांनी सावदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले.






निवेदनात म्हटले आहे की, सध्या विवाह नोंदणी प्रमाणपत्रावर QR कोड नसल्यामुळे नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः नवविवाहित जोडप्यांना मतदार नोंदणी, मतदार यादीतील दुरुस्ती तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेताना कागदपत्रांच्या डिजिटल पडताळणीमध्ये अडथळे निर्माण होत आहेत.

बहुतांश शासकीय कार्यालयांमध्ये QR कोड असलेल्या कागदपत्रांना प्राधान्य दिले जात असल्याने विवाह नोंदणी प्रमाणपत्रावरही QR कोड सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग, आरोग्य सेवा संचालक व संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून राज्यातील सर्व उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयांमधून QR कोडयुक्त विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच यापूर्वी जारी करण्यात आलेल्या विवाह नोंदणी प्रमाणपत्रांनाही QR कोडसह सुधारित प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याबाबत शासन स्तरावर आवश्यक निर्देश देण्यात यावेत, असेही निवेदनात म्हटले आहे.

या जनहिताच्या मागणीवर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेऊन नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी अपेक्षा सूरज परदेशी यांनी व्यक्त केली. यावेळी शिवसेना शहर संघटक निलेश खाचणे, राकेश बोराखडे व भूषण परदेशी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.