नाशिकमध्ये धक्कादायक घटना; नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म, चौकशी सुरू
नाशिकमध्ये धक्कादायक घटना; नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म, चौकशी सुरू
लेवाजगत न्युज | नाशिक : नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातून एक अत्यंत संवेदनशील आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. मोहनदरी येथील शासकीय आदिवासी निवासी आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या नववीतील एका अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, संबंधित यंत्रणांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, विद्यार्थिनीवर तिच्याच नात्यातील एका अल्पवयीन मुलाकडून लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेत तपास सुरू केला आहे. कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नाशिकचे आदिवासी विकास अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांनी घटनेला दुजोरा दिला आहे. प्रशासनाच्या प्राथमिक माहितीनुसार, हा प्रकार आश्रमशाळेच्या आवारात घडलेला नसून विद्यार्थिनी सुट्टीच्या काळात गावी असताना घटना घडल्याची शक्यता आहे.
मात्र, विद्यार्थिनी गरोदर असल्याची बाब वेळेत लक्षात का आली नाही, याबाबत आश्रमशाळेतील आरोग्य तपासणी, शिक्षक, वॉर्डन आणि संबंधित कर्मचाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी केली जात आहे. निवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षेसाठी असलेल्या व्यवस्थेवर या घटनेनंतर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
पीडित विद्यार्थिनीची ओळख कायद्यानुसार गोपनीय ठेवण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस आणि आदिवासी विकास विभागाकडून सुरू आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत