Contact Banner

तापी पुलावर धावती कार आगीत भस्म; सावद्यातील तिघांचे प्रसंगावधानाने प्राण वाचले

 

tapi-bridge-running-car-fire-savda-three-escape-safe


तापी पुलावर धावती कार आगीत भस्म; सावद्यातील तिघांचे प्रसंगावधानाने प्राण वाचले


लेवाजगत न्यूज यावल :-

गुरुवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास जळगावहून यावलकडे येत असलेल्या एका पेट्रोल कारला (क्र. MH-02-BR-0981) कोळन्हावी येथील तापी नदीच्या पुलावर अचानक भीषण आग लागली. बोनटमधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालकाने तातडीने कार पुलावर थांबवली. कारमधील सावदा येथील तिघेही तात्काळ बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र काही क्षणांतच कारने पेट घेत संपूर्ण वाहन जळून खाक झाले.





कारमध्ये चालक अमित बेंडाळे, त्यांची आठ वर्षांची मुलगी काव्या आणि लहान भाऊ पराग हे प्रवास करत होते. प्रसंगावधान राखत तिघेही वेळेत बाहेर पडल्याने त्यांचे प्राण वाचले.


अमित बेंडाळे यांनी सांगितले की, "आम्ही जळगावहून सावद्याकडे जात होतो. तापी पुलावर अचानक बोनटमधून धूर दिसू लागल्याने मी त्वरित गाडी थांबवली. आम्ही दारे उघडून खाली उतरलो आणि क्षणार्धात कारने पेट घेतला. पूल मोठा असल्याने गाडी अनियंत्रित होऊन खाली कोसळण्याचाही धोका होता. अवघा पाच मिनिटांचा उशीर झाला असता तर आज आम्ही जिवंत नसतो."


प्राथमिक माहितीनुसार, इंजिनच्या भागात पेट्रोलची गळती झाल्यामुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पेट्रोल अत्यंत ज्वलनशील असल्याने काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण केले आणि कार पूर्णपणे जळून खाक झाली.


घटनेमुळे काही काळ तापी पुलावर वाहतूक कोंडीत अडकली. माहिती मिळताच यावल पोलीस ठाण्याचे हवालदार दिवाकर जोशी, राजू तडवी तसेच कोळन्हावीचे पोलिस पाटील घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या सहाय्याने जळालेली कार पुलाच्या एका बाजूला हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.