Contact Banner

नूतन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त भक्तिमय दिंडी सोहळा उत्साहात

 

nutan-english-medium-school-ashadhi-ekadashi-grand-dindi-celebration-chinawal

नूतन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त भक्तिमय दिंडी सोहळा उत्साहात

चिनावल (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी) : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त नूतन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शुक्रवारी (दि. २४) भक्तिमय वातावरणात भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. टाळ-मृदुंगाच्या गजरात, "ज्ञानोबा-तुकाराम" आणि "पांडुरंग विठ्ठल"च्या अखंड नामघोषाने संपूर्ण विद्यालय परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. वारकरी वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे दिंडी सोहळ्याला विशेष आकर्षण लाभले.






कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुनील महाजन, चेअरमन खेमचंद्र पाटील आणि सेक्रेटरी गोपाळ पाटील यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर पारंपरिक टाळ, मृदुंग, अभंग, हरिनामाच्या गजरात आणि फुगड्यांच्या तालावर दिंडीला प्रारंभ झाला. विद्यार्थ्यांनी परिसरातून दिंडी काढत वारकरी संप्रदायाची परंपरा जपत आषाढी एकादशीचा संदेश दिला.

यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारिणी सदस्य मनोहर पाटील, नूतन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य संदीप चौधरी, नूतन प्राथमिक विद्यालयाचे प्राचार्य गणेश बाविस्कर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नूतन इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य जगदीश धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. कार्यालयीन कर्मचारी वैभव महाजन यांनीही नियोजनात मोलाचे योगदान दिले. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध, भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संत परंपरेचे विचार, वारकरी संप्रदायाची संस्कृती, भक्ती, समता, एकात्मता आणि सामाजिक मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश देण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी विद्यालयाच्या या उपक्रमाचे कौतुक करत अशा सांस्कृतिक व आध्यात्मिक कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच चालना मिळत असल्याचे मत व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.