राष्ट्रीय पोलीस तायक्वांदो स्पर्धेसाठी रायगडच्या सुभाष पाटील यांची स्पर्धा प्रमुखपदी निवड प्रशांत घरत पंच, तर मयुरी खरात खेळाडू म्हणून राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी
राष्ट्रीय पोलीस तायक्वांदो स्पर्धेसाठी रायगडच्या सुभाष पाटील यांची स्पर्धा प्रमुखपदी निवड
प्रशांत घरत पंच, तर मयुरी खरात खेळाडू म्हणून राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी
उरण | सुनील ठाकूर
भारतीय पोलीस दल, हैदराबाद पोलीस, भारत सरकारचे युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय आणि तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हैदराबाद येथील बालयोगी इनडोअर स्टेडियममध्ये २३ ते २७ जुलै २०२६ दरम्यान आयोजित राष्ट्रीय पोलीस तायक्वांदो स्पर्धेसाठी रायगडचे आंतरराष्ट्रीय पंच व सातव्या डिग्रीचे ब्लॅक बेल्टधारक सुभाष पाटील यांची स्पर्धा प्रमुख (Competition Manager) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रशांत घरत यांची पंच म्हणून निवड झाली आहे.
तायक्वांदो क्षेत्रात पंच, प्रशिक्षक आणि संघटक म्हणून सुभाष पाटील यांनी देश-विदेशात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गेल्या वर्षी जम्मू-काश्मीर येथे झालेल्या राष्ट्रीय पोलीस तायक्वांदो स्पर्धेचे त्यांनी यशस्वी आयोजन केले होते. त्यांच्या अनुभवाचा लाभ पोलीस खेळाडू, प्रशिक्षक आणि पंचांना व्हावा तसेच देशाला अधिक गुणवत्तापूर्ण पंच, प्रशिक्षक आणि खेळाडू मिळावेत, या उद्देशाने तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाने त्यांची या पदासाठी निवड केली आहे.
या राष्ट्रीय स्पर्धेसाठी नवी मुंबई पोलिस दलातील मयुरी खरात हिची खेळाडू म्हणून निवड झाली आहे. मयुरी गेल्या १५ ते १७ वर्षांपासून सुभाष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तायक्वांदोचे प्रशिक्षण घेत आहे.
सुभाष पाटील, प्रशांत घरत आणि मयुरी खरात यांच्या निवडीबद्दल रायगड तायक्वांदो असोसिएशन, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई) तसेच विविध पदाधिकारी, प्रशिक्षक, आमदार प्रशांत ठाकूर, विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील, माजी सभागृह नेते परेश ठाकूर आणि महापौर नितीन पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले. विविध क्षेत्रातील मान्यवरांकडूनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत