गोदावरीत संत मुक्ताईंच्या पादुकांचे पवित्र स्नान; बीड जिल्ह्यात पालखीचा प्रवेश, ३५० किमी पदयात्रा पूर्ण
गोदावरीत संत मुक्ताईंच्या पादुकांचे पवित्र स्नान; बीड जिल्ह्यात पालखीचा प्रवेश, ३५० किमी पदयात्रा पूर्ण
मुक्ताईनगर लेवाजगत न्यूज प्रतिनिधी-
आदिशक्ती संत मुक्ताईंचा ३१८ वा आषाढी वारी पालखी सोहळा विठ्ठल नामाच्या अखंड गजरात आणि भक्तिभावाच्या वातावरणात पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. बुधवारी (दि. ८) संत मुक्ताईंच्या चांदीच्या पादुकांचे गोदावरी नदीत विधिवत पवित्र स्नान करण्यात आले. या धार्मिक सोहळ्यानंतर पालखीने बीड जिल्ह्यात प्रवेश केला. गोदावरी तीरावर पार पडलेल्या या सोहळ्यास वारकरी, भाविक आणि स्थानिक नागरिकांची मोठी उपस्थिती होती.
२४ जून रोजी कोथळी येथील संत मुक्ताई मूळ मंदिरातून चांदीच्या रथात विराजमान झालेल्या पादुका पंढरपूरकडे प्रस्थान झाल्या. जळगाव, बुलडाणा आणि जालना जिल्ह्यांतील भक्तिमय प्रवास पूर्ण करून पालखी आता बीड जिल्ह्यात दाखल झाली आहे. तापी तीरावरून भीमातीराकडे निघालेल्या या ऐतिहासिक वारीत प्रत्येक टप्प्यावर भक्ती, समता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिला जात आहे.
मंगळवारी (दि. ७) पालखीचा मुक्काम वडीगोद्री येथे झाला असून ग्रामस्थांनी वारकऱ्यांसाठी अन्नदानाची व्यवस्था केली होती. बुधवारी दुपारचा विसावा शहागड येथे रामकृष्ण जगताप यांच्या ठिकाणी झाला. त्यानंतर गेवराईकडे जाताना संत मुक्ताईंच्या चांदीच्या पादुकांना गोदावरी नदीत पवित्र स्नान घालण्यात आले. टाळ-मृदंगाच्या निनादात आणि "संत मुक्ताई माऊली की जय"च्या घोषणांनी परिसर भक्तिमय झाला. बुधवारी रात्री पालखीचा मुक्काम गेवराई येथे झाला असून ग्रामस्थांनी भोजनाची व्यवस्था केली.
पालखीने आतापर्यंत सुमारे ६०० किमीच्या प्रवासापैकी ३५० किमी अंतर पदयात्रेद्वारे पूर्ण केले असून सुमारे २५० किमीचा प्रवास शिल्लक आहे.
पुढील मुक्काम व अन्नदान
गुरुवारी (दि. ९) पालखीचा दुपारचा विसावा समर्थ साखर कारखाना, अंकुशनगर येथे होणार असून कारखान्याच्या वतीने वारकऱ्यांसाठी अन्नदान करण्यात येणार आहे. त्यानंतर पालखी पाडळसिंगी येथे मुक्कामी दाखल होईल. चित्तेश्वर महादेव संस्थान आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने वारकरी व भाविकांसाठी भोजन व निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.
यंदाच्या आषाढी वारीत गोदावरी स्नानाचा पवित्र सोहळा, मार्गावरील गावोगावी होत असलेले उत्स्फूर्त स्वागत, अन्नदानाची अखंड सेवा आणि संत मुक्ताईंच्या नामस्मरणाने दुमदुमलेला पालखी मार्ग यामुळे भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी संदेश समाजापर्यंत पोहोचत आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत