संपूर्ण समर्पणातून मिळणारी आनंदानुभूती हीच खरी गुरुपौर्णिमा – कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत
संपूर्ण समर्पणातून मिळणारी आनंदानुभूती हीच खरी गुरुपौर्णिमा – कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत
फैजपूर लेवाजगत न्यूज प्रतिनिधी :-
गुरूंप्रती संपूर्ण समर्पणातून मिळणारी अभिमानाची व आनंदानुभूती हीच खरी गुरुपौर्णिमा असून, आपल्या कृतीमुळे माता-पिता, शिक्षक आणि गुरु यांना अभिमान वाटेल असे जीवन प्रत्येक विद्यार्थ्याने जगावे, असे प्रेरणादायी प्रतिपादन तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाचे इंग्रजी विभागप्रमुख तथा राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत यांनी केले.
स्व. कुसुमताई मधुकरराव चौधरी विद्यालय, फैजपूर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. हिमा सुधाकर चौधरी होत्या. यावेळी मुख्याध्यापक श्री. इमरान तडवी, वरिष्ठ शिक्षक श्री. एल. जे. बोंडे, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत यांनी गुरूचे जीवनातील महत्त्व अधोरेखित करताना, अंधकारातून प्रकाशाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे आणि कुमतीतून सुमतीकडे नेणारा गुरु असतो, असे सांगितले. या ब्रह्मांडातील प्रत्येक व्यक्ती, वस्तू, पशू-पक्षी यांच्याकडूनही सकारात्मकता शिकता येते, असे त्यांनी नमूद केले.
महर्षी वेदव्यास यांच्या जयंतीनिमित्त आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी गुरु, माता-पिता आणि शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा असल्याचे सांगत त्यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व, गुरु-शिष्य परंपरा, पौराणिक संदर्भ आणि समाजाप्रती विद्यार्थ्यांची कर्तव्ये याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थी संचित कोळी याने संत मुक्ताबाई आणि चांगदेव यांच्या गुरु-शिष्य परंपरेतील उदाहरणातून गुरुंचे महात्म्य प्रभावीपणे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पल्लवी भारुडे यांनी केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत