Contact Banner

स्वच्छ उत्पादन, दर्जेदार पॅकिंग आणि मार्केटिंगवर एफडीएचा भर; सावद्यातील वेफर्स उत्पादकांना मार्गदर्शन

 

savda-banana-wafers-makers-guided-on-food-safety-and-cleanliness-rules

स्वच्छ उत्पादन, दर्जेदार पॅकिंग आणि मार्केटिंगवर एफडीएचा भर; सावद्यातील वेफर्स उत्पादकांना मार्गदर्शन

सावदा लेवाजगत न्यूज प्रतिनिधी-





सावदा परिसरातील केळी वेफर्स उत्पादकांवर सुरू असलेल्या अन्न सुरक्षा विभागाच्या तपासणीमुळे निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी सोमवारी सुमारे १५ लघुउद्योजकांनी जळगाव येथील अन्न व औषध प्रशासन (एफडीए) कार्यालयात सहायक आयुक्त दीनानाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत अधिकाऱ्यांनी अन्न सुरक्षा नियमांचे पालन केल्यास कोणतीही कारवाई होणार नसल्याचे स्पष्ट करत व्यावसायिकांना दिलासा दिला.

सावदा व सावदा रेल्वे स्थानक परिसरात कच्च्या केळीपासून वेफर्स तयार करणारे अनेक लघुउद्योजक कार्यरत आहेत. यापैकी अनेकांनी अन्न सुरक्षा विभागाकडे नोंदणी करून आवश्यक परवाने घेतले आहेत. काही आस्थापनांविषयी प्राप्त झालेल्या तक्रारींच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता स्वच्छतेसंदर्भातील काही त्रुटी आढळल्या. त्यानंतर संबंधितांना दंडात्मक कारवाईसह सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या.

या पार्श्वभूमीवर भूषण शिंदे, विजय पाटील यांच्यासह सुमारे १५ वेफर्स उत्पादकांनी सहायक आयुक्तांची भेट घेऊन आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.

यावेळी सहायक आयुक्त दीनानाथ शिंदे यांनी अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन, स्वच्छ उत्पादन प्रक्रिया, योग्य पॅकिंग व लेबलिंग यावर भर दिला. तसेच दोनदा वापरलेले खाद्यतेल बायोडिझेल निर्मितीसाठी विकण्याबाबत मदत करण्याचे आश्वासन दिले. व्यावसायिकांनी एकत्र येऊन संघटना स्थापन करावी, उत्पादनाचे दर्जेदार विपणन करावे आणि दरांमध्ये सुसंगती ठेवावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

बैठकीनंतर व्यावसायिकांची भीती दूर झाली असून, अन्न सुरक्षा नियमांचे पूर्ण पालन करून व्यवसाय सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.