विश्वासघात! नोकरानेच रचला चोरीचा बनाव; १.९८ लाखांची रक्कम ४ तासांत हस्तगत- सावदा पोलिसांची कामगिरी
विश्वासघात! नोकरानेच रचला चोरीचा बनाव; १.९८ लाखांची रक्कम ४ तासांत हस्तगत- सावदा पोलिसांची कामगिरी
सावदा लेवाजगत न्यूज प्रतिनिधी-
रावेर तालुक्यातील थोरगव्हाण येथील सरकारमान्य देशी दारू दुकानातील जवळपास १ लाख ९८ हजार रुपयांची चोरी झाल्याचा बनाव रचणाऱ्या नोकराला सावदा पोलिसांनी अवघ्या चार तासांत अटक करून संपूर्ण रक्कम जप्त केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेर येथील रहिवासी राजेंद्र भागवत जयस्वाल यांच्या मालकीचे थोरगव्हाण येथे सरकारमान्य देशी दारूचे दुकान आहे. या दुकानातील व्यवसायातून जमा झालेली रोकड नेहमीप्रमाणे त्यांच्याकडे काम करणारा शेख सुफियान शेख अतीक (वय २०) हा रावेर येथे पोहोचवत असे.
१३ जुलै रोजी सकाळी सुमारे ११.४५ वाजता दुकानातील १ लाख ९८ हजार रुपयांची रोकड घेऊन तो रावेरकडे निघाला. त्यानंतर सावदा–रावेर मार्गावरील राजदीप पेट्रोलपंपाजवळ दोन अज्ञात व्यक्तींनी पल्सर दुचाकीवर येऊन पैशांची पिशवी हिसकावून नेल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली.
या तक्रारीनंतर सावदा पोलिसांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. सुरुवातीला कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही. दरम्यान, अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान पोलिसांना शेख सुफियानच्या जबाबाबाबत संशय आल्याने त्याची सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने चोरीचा बनाव स्वतःच रचल्याची कबुली दिली. विश्वासाने दिलेली रोकड त्याने स्वतःच लपवून ठेवली असल्याचे उघड झाले.
यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेचे कलम ३०६ वाढवून आरोपीला अटक केली. त्याच्याकडून १ लाख ९८ हजार रुपयांची संपूर्ण रक्कम जप्त करण्यात आली. हा गुन्हा अवघ्या चार तासांत उघडकीस आणण्यात सावदा पोलिसांना यश आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड, पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप तसेच सावदा पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत