गढूळ पाण्याच्या तक्रारीनंतर सावदा नगराध्यक्षांकडून फिल्टर प्लांटवर पाहणी; नागरिकांना पाणी उकळून पिण्याचे आवाहन
गढूळ पाण्याच्या तक्रारीनंतर सावदा नगराध्यक्षांकडून फिल्टर प्लांटवर पाहणी; नागरिकांना पाणी उकळून पिण्याचे आवाहन
सावदा लेवाजगत न्यूज प्रतिनिधी : सावदा शहरातील काही भागांत नळाद्वारे गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सावदा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा रेणुका पाटील, उपनगराध्यक्ष फिरोज खान हबीबुल्ला खान पठाण,नगरसेवक पंकज येवले,नगरसेविका तथा गटनेते रंजना भारंबे मुख्याधिकारी भूषण वर्मा, पाणीपुरवठा विभागप्रमुख प्रियांका जैन तसेच संबंधित कर्मचारी यांनी थोरगव्हाण रस्त्यावरील फिल्टर प्लांटला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी मुख्याधिकारी भूषण वर्मा यांनी पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी TDS चाचणी केली. नगराध्यक्षा रेणुका पाटील व पाणीपुरवठा सभापती यांनी पाणीपुरवठा विभागप्रमुख प्रियांका जैन यांना पाणीपुरवठ्याच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या.
शहरातील ज्या ठिकाणी पाईपलाईनमध्ये गळती (लिकेज) आढळून येईल, त्या ठिकाणी तातडीने दुरुस्तीची कामे करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले. पावसाळ्यामुळे पाणी दूषित होण्याची शक्यता लक्षात घेऊन पाणीपुरवठा यंत्रणा अधिक दक्ष ठेवण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाणी गाळून व उकळूनच पिण्याचे आवाहन नगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे. तसेच पाणीपुरवठ्याबाबत कोणतीही तक्रार असल्यास ती तातडीने नगरपालिकेकडे नोंदवावी, असेही आवाहन करण्यात आले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत