एसटी प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय; NCMC स्मार्ट कार्डची सक्ती १ सप्टेंबरपर्यंत पुढे ज्येष्ठ नागरिक व महिलांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन मंत्र्यांचा निर्णय
🚍 एसटी प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय; NCMC स्मार्ट कार्डची सक्ती १ सप्टेंबरपर्यंत पुढे
ज्येष्ठ नागरिक व महिलांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन मंत्र्यांचा निर्णय
मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) विविध प्रवासी सवलतींचा लाभ घेण्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला आता १ सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.
यापूर्वी १ ऑगस्ट २०२६ पासून NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात येणार होते. मात्र, अनेक पात्र प्रवाशांनी नोंदणी करूनही त्यांना अद्याप स्मार्ट कार्ड प्राप्त झालेले नसल्याने ते शासनाच्या प्रवासी सवलतींपासून वंचित राहू नयेत, यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी प्रवास, ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत आणि महिला प्रवाशांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत पूर्वीप्रमाणे उपलब्ध राहणार आहे.
याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, एसटी प्रवाशांसाठी शासनाने दिलेल्या सवलतींचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. तांत्रिक किंवा प्रक्रियात्मक अडचणींमुळे कोणत्याही प्रवाशाची गैरसोय होऊ नये, यासाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या अंमलबजावणीस १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
दरम्यान, ज्या पात्र प्रवाशांनी अद्याप NCMC स्मार्ट कार्डची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी या वाढीव मुदतीचा लाभ घेत लवकरात लवकर नोंदणी व कार्ड प्राप्त करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत