७१ मित्रांचा १० वर्षांपासून साहित्य वाटपाचा वसा; दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत
७१ मित्रांचा १० वर्षांपासून साहित्य वाटपाचा वसा; दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत
लेवाजगत न्युज नाशिक :-
समाजातील वंचित आणि गरजू घटकांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने ‘एक हात अनाथांसाठी’ या संस्थेने गेल्या दहा वर्षांपासून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम सुरू ठेवला आहे. यंदाही त्र्यंबक तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स ड्रेस, स्कूल बॅग, वॉटर बॉटल तसेच अन्य शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमासाठी संस्थेच्या ७१ सदस्यांनी स्वेच्छेने वर्गणी जमा करून विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला. ‘समाजाचे देणे लागतो’ या भावनेतून कार्य करणाऱ्या या समूहाने यापूर्वीही आळंदी धरण परिसरातील जिल्हा परिषद शाळा, त्र्यंबकेश्वरमधील महिला आश्रमशाळा तसेच अनेक शाळांमध्ये सातत्याने मदत केली आहे.
आळंदी धरण जिल्हा परिषद शाळेत झालेल्या साहित्य वाटप कार्यक्रमात संस्थेचे सचिन विंचाल, किरण पडवळ, प्रकाश जाधव, अजिंक्य बिरारी, जयवंत गायकवाड, गिरीश थुल यांच्यासह सदस्य उपस्थित होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अमोल बावा आणि सहशिक्षक संजय चव्हाण यांनी संस्थेचे आभार मानले.
१० वर्षांपूर्वी १० मित्रांपासून सुरुवात
‘एक हात अनाथांसाठी’ या समूहाची स्थापना सुमारे १० वर्षांपूर्वी १० मित्रांच्या सहभागातून छोट्या स्वरूपात झाली. पारदर्शक पद्धतीने सुरू असलेल्या सामाजिक कार्यामुळे समूहाशी पुढे अधिकाधिक दाते जोडले गेले. आज या समूहात ७१ सदस्य असून, ते स्वतःच्या खिशातून वर्गणी जमा करून अनाथ, महिला आणि ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी सातत्याने मदत करत आहेत.
विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी प्रेरणादायी उपक्रम
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी दानशूर व्यक्ती आणि सामाजिक संस्थांचा सहभाग महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांना दिलेले शैक्षणिक साहित्य हे केवळ वस्तू नसून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि पुढील शिक्षणासाठी मोठी प्रेरणा आहे. या मदतीमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास निश्चितच वाढेल, असे मत शाळेचे मुख्याध्यापक अमोल बावा यांनी व्यक्त केले.
‘एक हात अनाथांसाठी’ समूहाचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे आणि सामूहिक दातृत्वाचे अनुकरणीय उदाहरण ठरत आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत