Contact Banner

आर्थिक दुर्बल लेवा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण सहाय्य योजना

 

leva-bhratrimandal-pimple-saudagar-education-assistance-scholarship-2026

आर्थिक दुर्बल लेवा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण सहाय्य योजना

लेवाजगत न्यूज पिंपळे सौदागर : लेवा भ्रातृमंडळ, पिंपळे सौदागर, पुणे यांच्या वतीने लेवा समाजातील आर्थिक दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी ‘कै. नारायण सुपडू पिंपळे स्मृती शिक्षण सहाय्य योजना’ राबविण्यात येत आहे. अमेरिकास्थित श्री. अजित काळे व त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक सहाय्यातून ही योजना राबविण्यात येत असून, सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात प्रथम वर्ष पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.






लेवा भ्रातृमंडळाच्या २५ जुलै २०२६ रोजी झालेल्या सभेत याबाबत निर्णय घेण्यात आला. या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शुल्क तसेच शिक्षणाच्या कालावधीतील निवास व भोजन खर्चासाठी आर्थिक सहाय्य मिळू शकते.

लेवा पाटीदार समाजातील अत्यल्प उत्पन्न गटातील विद्यार्थी-विद्यार्थिनी किंवा त्यांच्या पालकांनी साध्या कागदावर प्राथमिक अर्ज करावा. अर्जामध्ये विद्यार्थ्याचे एसएससी/एचएससीमधील गुण, प्रवेश घेतलेली किंवा निश्चित केलेली शिक्षण शाखा व महाविद्यालय, अपेक्षित फी व इतर खर्चासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न, निवासाचा पत्ता आणि संपर्क क्रमांक आदी माहिती नमूद करावी.

प्राथमिक अर्ज ७८२२०४९४२३ किंवा ९५९५४०६५१६ या क्रमांकावर पाठवावेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत २५ ऑगस्ट २०२६ आहे.

अत्यल्प उत्पन्न असलेल्या, उत्पन्नाचा निश्चित स्रोत नसलेल्या भूमिहीन कुटुंबातील विद्यार्थी तसेच माता किंवा पित्याचे छत्र नसलेल्या विद्यार्थ्यांचा प्राधान्याने विचार केला जाणार आहे.

प्राथमिक अर्जांची छाननी केल्यानंतर कार्यकारिणीला योग्य वाटलेल्या अर्जदारांना मंडळाचा अधिकृत अर्ज फॉर्म पाठविला जाईल. हा फॉर्म पूर्ण भरून आवश्यक कागदपत्रांसह मंडळाकडे सादर करावा लागेल. त्यानंतर मंडळाच्या तीन सदस्यीय समितीकडून अर्जातील माहिती व कागदपत्रांची सत्यता पडताळण्यात येईल. समितीच्या अहवालानुसार सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या कार्यकारिणीच्या सभेत शिष्यवृत्तीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.

मंडळाच्या कार्यकारिणीचा निर्णय अंतिम राहणार असून, उपलब्ध निधी गरजेनुसार एका किंवा अधिक विद्यार्थ्यांमध्ये विभागून देण्याचा अधिकार मंडळाकडे राहणार आहे.

मागील वर्षी तीन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

मागील वर्षी मंडळाने तीन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करून वितरित केली होती. यापूर्वीही पाच विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी मंडळाने आर्थिक सहाय्य केले आहे.

दरम्यान, मंडळातर्फे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली इंजिनीअरिंग प्रवेश प्रक्रियेबाबत ऑनलाइन मार्गदर्शन सत्रे तसेच घरगुती व्यवसाय करणाऱ्या बांधवांसाठी मार्गदर्शन सत्रे सुरू आहेत. गरजू समाजबांधवांनी या उपक्रमांचाही लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.