Contact Banner

सावदा पोलिसांची मोठी कारवाई; साडेदहा लाखांचा गुटखा जप्त प्रतिबंधित विमल पानमसाला व तंबाखूची वाहतूक करणाऱ्या एकास अटक; कारसह १०.२७ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

 

Savda-Police-Seize-Gutkha-Worth-Rs-10-27-Lakh-One-Arrested

सावदा पोलिसांची मोठी कारवाई; साडेदहा लाखांचा गुटखा जप्त

प्रतिबंधित विमल पानमसाला व तंबाखूची वाहतूक करणाऱ्या एकास अटक; कारसह १०.२७ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

लेवाजगत न्यूज सावदा : महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखू, विमल पानमसाला व गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला सावदा पोलिसांनी रंगेहात पकडले. तांदलवाडी फाट्याजवळ सापळा रचून केलेल्या या कारवाईत पोलिसांनी गुटखा व वाहतुकीसाठी वापरलेली होंडा अमेझ कार असा एकूण १० लाख २७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.






दिनांक २७ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १०:५० वाजता सावदा पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, राखाडी रंगाच्या होंडा अमेझ (MH-19-CV-4445) कारमधून प्रतिबंधित गुटख्याची चोरटी वाहतूक होणार आहे. त्यानुसार पोलिसांनी तांदलवाडी फाट्याजवळ सापळा रचला. रात्री ११:०४ वाजता संशयित कार येताच पोलिसांनी ती थांबवून तपासणी केली.

कारचालक सारंग मुरलीधर अवचार (वय ३१, रा. अकलूद, ता. यावल, जि. जळगाव) याची चौकशी केली असता कारमध्ये प्रतिबंधित गुटखा असल्याचे समोर आले. दोन पंचांसमक्ष कारची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात विमल पानमसाला, केशरयुक्त पानमसाला आणि तंबाखूची पाकिटे आढळून आली.

पोलिसांनी ५ लाख २७ हजार ७०० रुपये किमतीचा प्रतिबंधित पानमसाला व तंबाखू, तसेच गुटख्याच्या वाहतुकीसाठी वापरलेली ५ लाख रुपये किमतीची होंडा अमेझ कार असा एकूण १० लाख २७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने हा प्रतिबंधित माल मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर येथील एका व्यापाऱ्याकडून भुसावळ व वरणगाव परिसरात किरकोळ विक्री करण्यासाठी आणल्याचे सांगितले आहे.

याप्रकरणी सावदा पोलीस स्टेशनमध्ये FIR क्रमांक ०२२२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ मधील कलम १२३, २७४, २७५, १०६, २२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील कलम २६(२)(i), २६(२)(iv), ३०(२)(a) व ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड, पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप, पोहेका/४६८ निलेश बाविस्कर आदींनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप करीत आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.