शेतकऱ्यांना ‘राष्ट्रीय अन्नदाता’ ही विशेष राष्ट्रीय उपाधी व दर्जा द्यावा राष्ट्रपती, पंतप्रधान व केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे शिशिर डी. जावळे यांची मागणी
शेतकऱ्यांना ‘राष्ट्रीय अन्नदाता’ ही विशेष राष्ट्रीय उपाधी व दर्जा द्यावा
राष्ट्रपती, पंतप्रधान व केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे शिशिर डी. जावळे यांची मागणी
लेवाजगत न्यूज भुसावळ : भारतीय शेतकरी हा संपूर्ण देशाचा अन्नदाता असून देशाच्या अन्नसुरक्षेचा प्रमुख आधारस्तंभ आहे. त्यामुळे भारतीय शेतकऱ्याला ‘राष्ट्रीय अन्नदाता’ ही विशेष राष्ट्रीय उपाधी व सन्माननीय दर्जा बहाल करण्यात यावा, अशी मागणी समाजसेवक शिशिर डी. जावळे यांनी केली आहे.
याबाबत जावळे यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री तसेच संबंधित केंद्रीय कार्यालयांकडे निवेदनाद्वारे ही मागणी मांडली आहे.
भारतीय शेतकरी ऊन, वारा, पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती तसेच विविध आर्थिक अडचणींचा सामना करत देशासाठी अन्नधान्याचे उत्पादन करतो. देशातील प्रत्येक नागरिकाच्या ताटात अन्न पोहोचविण्यात शेतकऱ्याचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या कष्टांना केवळ आर्थिक योजनांच्या माध्यमातून नव्हे, तर राष्ट्रीय सन्मानाच्या माध्यमातून स्वतंत्र ओळख मिळणे आवश्यक आहे, असे जावळे यांनी निवेदनात म्हटले आहे.
देशातील विविध महत्त्वाच्या घटकांना त्यांच्या राष्ट्रीय योगदानानुसार विशेष ओळख व सन्मान दिला जातो. त्याच धर्तीवर देशाच्या अन्नसुरक्षेचा आधार असलेल्या शेतकऱ्याला ‘राष्ट्रीय अन्नदाता’ ही विशेष राष्ट्रीय ओळख देण्यात यावी, अशी संकल्पना जावळे यांनी पुढे मांडली आहे. या उपाधीमुळे भारतीय शेतकऱ्याच्या योगदानाला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिक व्यापक मान्यता मिळून त्याची स्वतंत्र ओळख निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केंद्र सरकारने या मागणीचा गांभीर्याने विचार करून कृषी तज्ज्ञ, शेतकरी प्रतिनिधी, कायदेतज्ज्ञ आणि संबंधित अधिकाऱ्यांची समिती स्थापन करावी. तसेच ‘राष्ट्रीय अन्नदाता’ या उपाधीला अधिकृत मान्यता देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
“शेतकरी वाचला तर अन्नसुरक्षा वाचेल आणि अन्नसुरक्षा वाचली तर राष्ट्र सुरक्षित राहील,” असा संदेश देत शिशिर डी. जावळे यांनी या मागणीसाठी व्यापक जनसमर्थन उभे करण्याचे आवाहन केले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत