संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोघांना पोलिसांनी हटकले; एकाला अटक, ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त
संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोघांना पोलिसांनी हटकले; एकाला अटक, ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त
लेवाजगत न्यूज सावदा : सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रगस्ती दरम्यान संशयास्पदरीत्या गोणपाट घेऊन मोटारसायकलवरून जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी हटकले. पोलिसांना हुलकावणी देऊन पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांपैकी एकाला पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले, तर दुसरा अंधाराचा फायदा घेत पसार झाला. ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून ट्रकच्या तीन बॅटऱ्या आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दि. २७ ऑगस्ट रोजी रात्री ११ ते २८ ऑगस्ट रोजी सकाळी ५ वाजेपर्यंत सावदा पोलीस कर्मचारी व होमगार्ड हतनूर धरणाकडून हतनूर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्रगस्त घालत होते. दरम्यान, रात्री सुमारे १.३० वाजता उदळी गावाच्या बसस्थानकाजवळ सीबीझेड एक्स्ट्रीम मोटारसायकलवर दोन इसम गोणपाट घेऊन संशयास्पदरीत्या जाताना पोलिसांना दिसले.
पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला असता त्यांनी मोटारसायकलसह पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून सुमारे १.४५ वाजता त्यांना गाठले. यावेळी मोटारसायकल चालक मोहन प्रकाश कोळी (रा. कडगाव, ता. यावल) हा अंधाराचा फायदा घेत गल्लीबोळातून पसार झाला. मागे बसलेला विशाल शांताराम कोळी (वय २८, रा. कडगाव, ता. यावल) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्याच्याकडील गोणपाटाची तपासणी केली असता त्यामध्ये तीन ट्रकच्या बॅटऱ्या आढळून आल्या. या बॅटऱ्यांबाबत समाधानकारक माहिती न दिल्याने पोलिसांनी त्या जप्त केल्या. जप्त केलेल्या मुद्देमालात ५० हजार रुपये किमतीची एमएच-१९-बीएफ-९३४७ क्रमांकाची काळ्या रंगाची सीबीझेड एक्स्ट्रीम मोटारसायकल तसेच प्रत्येकी ७ हजार रुपये किमतीच्या तीन ट्रक बॅटऱ्यांचा समावेश आहे.
सदर बॅटऱ्या जळगाव शहरातील रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकमधून काढून चोरी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी सुनील जानकिराम कुरकुरे यांच्या फिर्यादीवरून सावदा पोलीस ठाण्यात FIR क्र. ०२२२/२०२६ अन्वये मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १२४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सावदा पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड, पोहेका/ अक्षय हिरोळे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील कुरकुरे, संजय तडवी, तसेच होमगार्ड प्रशांत पाटील व संतोष सपकाळे यांनी केली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत