Contact Banner

आरती बोरोले यांची ‘मिसेस गाया वर्ल्ड इंडिया २०२६’साठी निवड

 

aarti-borole-selected-for-mrs-gaya-world-india-2026

आरती बोरोले यांची ‘मिसेस गाया वर्ल्ड इंडिया २०२६’साठी निवड






चिनावल (ता. रावेर) : लेवाजगत न्यूज वार्ताहर
‘मिस महाराष्ट्र २०२५’चा किताब पटकावलेल्या चिनावल येथील मूळ रहिवासी आरती बोरोले यांची ‘मिसेस गाया वर्ल्ड इंडिया २०२६’ या मानाच्या किताबासाठी निवड झाली आहे. दिवा पेजंट्सतर्फे २ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित भव्य राज्याभिषेक सोहळ्यात त्यांना हा किताब प्रदान करण्यात आला.

यंदाच्या नोव्हेंबर महिन्यात मलेशिया येथे होणाऱ्या प्रतिष्ठित ‘Mrs. Gaia World 2026’ या आंतरराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धेत आरती बोरोले भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यापूर्वी दिल्ली येथे होणाऱ्या ‘गृहलक्ष्मी मिसेस इंडिया’ स्पर्धेतही त्या सहभागी होणार आहेत.

आरती बोरोले यांचा हा प्रेरणादायी प्रवास ‘Diva Pageants’च्या अंजना मस्कारेन्हास आणि कार्ल मस्कारेन्हास यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तसेच इमेज कन्सल्टंट सिसिलिया सन्याल आणि कोरिओग्राफर पूजा सिंग यांनीही त्यांच्या तयारीत मोलाचे मार्गदर्शन व सातत्यपूर्ण सहकार्य केले आहे. या सर्वांचे आरती बोरोले यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

“आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. भारताचा तिरंगा जागतिक मंचावर अभिमानाने फडकवण्यासाठी मी माझे सर्वोत्तम प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करेन,” असा विश्वास आरती बोरोले यांनी व्यक्त केला.

या यशाचे श्रेय त्यांनी आपल्या पतीसह कुटुंबीयांच्या पाठिंब्याला दिले आहे. आत्मविश्वास, मेहनत आणि देशाभिमानाच्या बळावर आरती बोरोले आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल चिनावलसह रावेर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.