डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर’
डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर’
लेवाजगत जळगाव : रक्षाबंधन सणानिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रुग्णालय, जळगाव येथे आजपासून ‘भव्य आरोग्य संपदा शिबिरा’चे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर ३० ऑगस्टपर्यंत रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहणार आहे.
शिबिरात डॉ. युवराज बढे (मधुमेह, हृदयरोग, फुफ्फुस व किडनी विकार) आणि डॉ. रोशन राजपूत (मेडिसिन) यांच्या मार्गदर्शनाखाली विविध आजारांची तपासणी व उपचार केले जाणार आहेत. ताप, सर्दी, खोकला, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, थायरॉईड, किडनी व लिव्हरचे आजार, श्वसनविकार, दमा, क्षयरोग (टीबी) यांसह अन्य आजारांवर वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
गरजेनुसार डायलिसिस, ब्राँकोस्कोपी, एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी, २ डी इको कार्डिओग्राफी, ऑक्सिजन, नेब्युलायझेशन, आयसीयू, व्हेंटिलेटर आणि रुग्णवाहिका सेवा उपलब्ध असणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी २४ तास तातडीची वैद्यकीय सेवा देण्यात येणार आहे.
शासनाच्या योजनांमध्ये समाविष्ट नसलेल्या आजारांवरही शिबिराच्या कालावधीत सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. तसेच आवश्यक तपासण्या, शस्त्रक्रिया आणि रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी विशेष सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत.
महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेणाऱ्या रुग्णांनी आयुष्मान कार्ड सोबत आणावे. आयुष्मान कार्ड उपलब्ध नसल्यास मूळ रेशन कार्ड आणि आधार कार्ड आणणे आवश्यक आहे.
गरजू नागरिकांनी या ‘आरोग्य संपदा शिबिरा’चा लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत