राष्ट्रीय हातमाग दिन उत्साहात; विद्यार्थिनींच्या कलाकुसरीने वेधले लक्ष
राष्ट्रीय हातमाग दिन उत्साहात; विद्यार्थिनींच्या कलाकुसरीने वेधले लक्ष
जळगाव : भारतीय हातमाग परंपरेचे जतन, संवर्धन तसेच विद्यार्थिनींमध्ये स्वदेशी उत्पादनांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्समध्ये राष्ट्रीय हातमाग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
राष्ट्रीय हातमाग दिन ७ ऑगस्ट रोजी भारताच्या समृद्ध वस्त्रोद्योग परंपरेचा तसेच देशभरातील विणकरांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. नयना झोपे आणि डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्सच्या प्राचार्य प्रा. डॉ. कविता देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या बांधणीच्या साड्या, हातमागावर तयार केलेल्या साड्या, आकर्षक रांगोळ्या तसेच विविध प्रकारच्या ज्वेलरीचे सुंदर प्रदर्शन भरविले. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या मान्यवरांनी विद्यार्थिनींच्या कलाकुसरीचे, सर्जनशीलतेचे आणि कौशल्याचे कौतुक केले.
विद्यार्थिनींनी सादर केलेल्या विविध कलाकृती व वस्तूंमधून भारतीय हातमाग परंपरेचे सौंदर्य, वैविध्य आणि कौशल्य प्रभावीपणे अधोरेखित झाले. अशा उपक्रमांमुळे पारंपरिक कला, स्थानिक कारागीर आणि स्वदेशी उद्योगांना प्रोत्साहन मिळते, असे उपस्थितांनी नमूद केले.
यावेळी प्राचार्य प्रा. डॉ. कविता देशमुख यांनी राष्ट्रीय हातमाग दिनाचे महत्त्व, भारतीय विणकरांचे योगदान तसेच हातमाग उद्योगासमोरील संधी आणि आव्हाने याविषयी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. स्वदेशी वस्तूंचा अधिकाधिक वापर करून स्थानिक कारागिरांना पाठबळ देण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास विधी महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. कीर्ती पाटील, प्रा. डॉ. ललिता सपकाळे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर श्रीमती मीनल राणे, ग्रंथपाल सौ. कविता भोरटेकर, प्रा. कोमल भालेराव तसेच एन.एस.एस. ऑफिसर प्रा. जयश्री कुलकर्णी यांनी मोलाचे सहकार्य केले.
विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे राष्ट्रीय हातमाग दिनाचा हा उपक्रम संस्मरणीय ठरला.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत