आदिशक्ती मुक्ताई पालखी आगमनानिमित्त १८ ऑगस्ट रोजी भव्य वारकरी संप्रदायिक दिंडी स्पर्धा
आदिशक्ती मुक्ताई पालखी आगमनानिमित्त १८ ऑगस्ट रोजी भव्य वारकरी संप्रदायिक दिंडी स्पर्धा
मुक्ताईनगर लेवाजगत न्यूज प्रतिनिधी-श्री संत मुक्ताबाई संस्थान, कोथळी–मुक्ताईनगर ते पंढरपूर आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या आगमनानिमित्त यंदाही भव्य वारकरी संप्रदायिक दिंडी स्पर्धा – २०२६ आयोजित करण्यात आली आहे. श्रावण शुद्ध ६, मंगळवार दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता या स्पर्धेला प्रारंभ होणार असून, वारकरी संप्रदायातील पुरुष, महिला आणि बाल गटांसाठी स्वतंत्र स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री संत मुक्ताबाई आषाढी वारी पालखीला अनेक वर्षांची समृद्ध परंपरा लाभली आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन पालखी मूळ स्थळी परत येत असल्याच्या निमित्ताने ग्रामस्थ, पंचक्रोशी परिसरातील भाविक, पालखी आगमन सोहळा उत्सव समिती, श्री संत मुक्ताबाई संस्थान आणि मुक्ताई वारकरी बहुउद्देशीय सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येत आहे.
स्पर्धेचा मार्ग श्री संत मुक्ताबाई संस्थान, बोदवड रोड, मुक्ताईनगर ते श्री संत मुक्ताबाई जुने मंदिर, श्री क्षेत्र कोथळी असा राहणार आहे.
बक्षिसांची आकर्षक रक्कम
पुरुष गट
- प्रथम : ₹१५,०००
- द्वितीय : ₹१०,०००
- तृतीय : ₹७,०००
महिला गट
- प्रथम : ₹९९,९९
- द्वितीय : ₹७,७७७
- तृतीय : ₹५,५५५
बाल गट
- प्रथम : ₹५,५५५
- द्वितीय : ₹३,३३३
- तृतीय : ₹२,२२२
याशिवाय प्रत्येक सहभागी दिंडीला प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येणार आहे.
स्पर्धेचे प्रमुख नियम
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत नोंदणी आवश्यक असून प्रवेश शुल्क ₹१०० ठेवण्यात आले आहे. प्रत्येक दिंडीत किमान २० वारकरी असणे आवश्यक आहे. बालगटात केवळ १६ वर्षांखालील मुलेच सहभागी होऊ शकतील. पुरुष व महिला गट स्वतंत्र असतील. पांढरा पोशाख, टाळ, मृदंग, वीणा आदी वाद्यांसह पारंपरिक वारकरी वेशभूषेला प्राधान्य देण्यात येणार आहे.
ड्रेस कोड, शिस्त, दिंडीची रचना, सांप्रदायिक चाल, संतवाणीचे सादरीकरण, स्वर-ताल, पावली आणि ठेका या निकषांवर परीक्षकांकडून मूल्यमापन करण्यात येईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
दिंडी सोहळ्याची सांगता दुपारी २ वाजता श्री संत मुक्ताबाई जुने मंदिर येथे होईल. त्यानंतर काल्याचे कीर्तन आणि मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळा पार पडणार आहे.
नोंदणीसाठी संपर्क
- ह.भ.प. विनायकराव हरणे पाटील – ९४२२६०९८६८
- ह.भ.प. उद्धव महाराज जुनारे – ९९७५१७२७५९
पालखी आगमन सोहळा समितीने पंचक्रोशीतील सर्व वारकरी दिंड्या, भजनी मंडळे आणि भाविकांना मोठ्या संख्येने सहभागी होऊन आदिशक्ती मुक्ताई माऊलीच्या स्वागत सोहळ्याला भक्तिमय स्वरूप देण्याचे आवाहन केले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत