४० गरजू विद्यार्थ्यांना दप्तर व शैक्षणिक साहित्याचे वाटप; ‘ऊँ सिद्धगुरू नित्यानंद प्रतिष्ठान’चा सलग आठव्या वर्षी सेवाभावी उपक्रम
भगवान श्री नित्यानंद गुरुदेवांच्या ६५व्या पुण्यतिथीनिमित्त भुसावळात विद्यार्थ्यांना महाप्रसाद
४० गरजू विद्यार्थ्यांना दप्तर व शैक्षणिक साहित्याचे वाटप; ‘ऊँ सिद्धगुरू नित्यानंद प्रतिष्ठान’चा सलग आठव्या वर्षी सेवाभावी उपक्रम
विशेष प्रतिनिधी / भुसावळ वार्ताहर
भुसावळ, दि. ८ ऑगस्ट :
“प्रत्येक प्राण्याला दुपारी १२ वाजता अन्न मिळालेच पाहिजे. कारण पोट भरल्याशिवाय कोणतेही कार्य करता येत नाही,” या उदात्त विचारातून भगवान श्री नित्यानंद गुरुदेवांच्या ६५व्या पुण्यतिथीनिमित्त भुसावळात शाळकरी विद्यार्थ्यांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. ‘ऊँ सिद्धगुरू नित्यानंद प्रतिष्ठान, भुसावळ’च्या वतीने सलग आठव्या वर्षी या अन्नदान व सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
तिथीनुसार आषाढ द्वादशीचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळा, महादेव माळ (ता. भुसावळ) येथील विद्यार्थ्यांना बटाट्याची भाजी, पुरी आणि श्रीखंड अशा स्वादिष्ट भोजनाचा महाप्रसाद देण्यात आला. विद्यार्थ्यांनी या प्रसादाचा आनंद घेतला.
४० विद्यार्थ्यांना दप्तर व शैक्षणिक साहित्य
महाप्रसादासोबतच प्रतिष्ठानच्या वतीने ४० गरजू विद्यार्थ्यांना नवीन दप्तर व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. नवीन दप्तर आणि अभ्यासाचे साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. प्रतिष्ठानच्या या शैक्षणिक मदतीचे उपस्थितांनी कौतुक केले.
अन्नदानाच्या पवित्र कार्याचा वारसा
यावेळी भगवान श्री नित्यानंद गुरुदेवांच्या विचारांचे स्मरण करण्यात आले. सौ. उज्वल कुंटे लिखित ‘आपले बाबाजी’ या पुस्तकातील २७व्या पाठाचा संदर्भ देत अन्नदानाचे महत्त्व विशद करण्यात आले. अन्नदान हे महापुण्याचे कार्य असून, त्यातून जीवाला खरे समाधान मिळते, असा संदेश यावेळी देण्यात आला.
मानवी जीवनातील व्याधी, उपाधी व भावरोग यांसारख्या अनेक दोषांपासून मुक्ती मिळविण्यासाठी अन्नदानाचे महत्त्व गुरुदेवांनी अधोरेखित केले होते. बालभोजन व साधू भोजनासारख्या पवित्र उपक्रमांची सुरुवात त्यांनी केली होती. त्याच सेवाभावी परंपरेचा वारसा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुढे नेला जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
चेतन झोपे व सहकाऱ्यांचे योगदान
कार्यक्रमातील भोजन व्यवस्थेची जबाबदारी तळवेल येथील रहिवासी चेतनभाऊ झोपे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सांभाळली. त्यांनी चवदार व उत्कृष्ट भोजनाची व्यवस्था केल्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक निलेश पाटील, सहशिक्षिका मीनाक्षी पाटील, तुकाराम पाटील, वैशाली पाटील, डॉ. नितु पाटील, डॉ. रेणुका पाटील, राहुल माळी, अनिकेत चव्हाण, राम शेटे, विवेक पाटील व चेतन झोपे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे सदस्य तोषल पाटील, चिरंजीव वेदांत, चिरंजीव दुर्वांग, दीपक फेगडे, योगेश मगरे, मझर शेख, गोलू शेख, कृष्णा माळी, साहिल माळी व मनोज गोसावी आदींनी परिश्रम घेतले. भक्तीमय व उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत