भुलेश्वरच्या राजावर लालबागच्या राजाचे वडिलकीचे छत्र मंडळाला ११ लाखांची मदत; मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपये
भुलेश्वरच्या राजावर लालबागच्या राजाचे वडिलकीचे छत्र
मंडळाला ११ लाखांची मदत; मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपये
उरण : सुनिल ठाकूर-
दक्षिण मुंबईतील भुलेश्वर येथील ‘भुलेश्वरचा राजा’ गणेशमूर्तीच्या आगमन मिरवणुकीदरम्यान घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेनंतर गणेशोत्सव मंडळावर शोककळा पसरली आहे. २२ फूट उंच गणेशमूर्तीचा तोल जाऊन ती कोसळल्याने मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवशे आणि गणेशभक्त ब्रिजेश जोशी यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर लालबाग येथील ‘लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’ने भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळाला वडिलकीच्या नात्याने मदतीचा हात पुढे केला आहे.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळाला ११ लाख रुपयांचा मदतनिधी जाहीर करण्यात आला आहे. तसेच या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या संकेत नेवशे आणि ब्रिजेश जोशी यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी या मदतीची घोषणा केली. गणेशोत्सवाच्या सुरुवातीलाच घडलेल्या या दुर्घटनेने गणेशभक्तांमध्ये हळहळ व्यक्त होत असताना, लालबागच्या राजाने पुढे केलेल्या मदतीच्या हातामुळे भुलेश्वरचा राजा मंडळ तसेच मृतांच्या कुटुंबीयांना मोठा आधार मिळणार आहे.
‘दुःख संपूर्ण गणेशोत्सव मंडळांचे’
“हे दुःख संपूर्ण गणेशोत्सव मंडळांचे दुःख आहे. या कठीण प्रसंगी भुलेश्वरचा राजा मंडळ आणि मृतांच्या कुटुंबीयांना मदत करणे हे आमचे कर्तव्य आहे. लालबागचा राजा मंडळ त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. ही मदत केवळ आर्थिक नसून दुःखाच्या काळात आधार देण्याची आमची जबाबदारी आहे,” असे मानद सचिव सुधीर साळवी आणि अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत