सावदा पोलिसांची धडक कारवाई; १ लाख ४९ हजार रुपयांचे गहाळ मोबाईल हस्तगत
सावदा पोलिसांची धडक कारवाई; १ लाख ४९ हजार रुपयांचे गहाळ मोबाईल हस्तगत
लेवाजगत न्यूज सावदा तालुका रावेर : सावदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत हरवलेले व गहाळ झालेले विविध कंपन्यांचे मोबाईल शोधण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी तब्बल १ लाख ४९ हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन हस्तगत केले असून, त्यापैकी मूळ मालकांचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सावदा पोलीस स्टेशनमध्ये मोबाईल हरवल्याबाबत नागरिकांच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी गहाळ नोंदवहीतील मोबाईलची माहिती संकलित केली. त्यानंतर CEIR (Central Equipment Identity Register) या ऑनलाइन पोर्टलवर संबंधित मोबाईलचे IMEI क्रमांक टाकून तांत्रिक विश्लेषण करण्यात आले.
या तपासाच्या आधारे भुसावळ, जळगाव जिल्ह्यासह विविध ठिकाणी शोध घेऊन खालील मोबाईल हस्तगत करण्यात आले.
- विलास कोळी (रा. वाघोदा खु.) यांचा २० हजार रुपये किमतीचा VIVO मोबाईल.
- कमलाकर पाटील (रा. रोझोदा) यांचा २० हजार रुपये किमतीचा Realme मोबाईल.
- विनोद जगन्नाथ वाघ (रा. वाघोदा बु.) यांचा १२ हजार रुपये किमतीचा Redmi मोबाईल.
- शेख फरहान शेख इरफान (रा. फैजपूर) यांचा १२ हजार रुपये किमतीचा VIVO मोबाईल.
- प्रशांत जावळे (रा. कळमोदा) यांचा १० हजार रुपये किमतीचा Motorola मोबाईल.
- वाकोला पोलीस स्टेशन, मुंबई येथील प्रॉपर्टी मिसिंगमधील १५ हजार रुपये किमतीचा VIVO मोबाईल.
- Apple कंपनीचे दोन iPhone मोबाईल, एकूण किंमत ६० हजार रुपये.
हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईल्सपैकी संबंधित मालकांची ओळख पटविण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे. तांत्रिक तपासाच्या माध्यमातून गहाळ मोबाईल शोधून काढल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप गावित आणि मुक्ताईनगर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पांडुरंग फड यांच्या नेतृत्वाखाली पोहेकॉ मोहसीन पठाण, पोहेकॉ विनोद तडवी, पोहेकॉ झाकीर मन्सूरी आणि पोलीस कॉन्स्टेबल मनोज तडवी यांनी मोबाईल शोध मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत