Contact Banner

सावद्यात घराघरांत ‘गृहसभा’; संतांच्या सान्निध्यात सत्संगाचा जागर

 

savadyat-gharoghari-gruhasabha-santanchya-sanidhyat-satsangacha-jagar

सावद्यात घराघरांत ‘गृहसभा’; संतांच्या सान्निध्यात सत्संगाचा जागर 

१८, १९,२० आणि २१ ऑगस्ट रोजी चार  कुटुंबांच्या घरी गृहसभा; हरिभक्त व नागरिकांनी आपल्या घरी गृहसभेसाठी मंदिराशी संपर्क साधण्याचे आवाहन

सावदा : ‘घर तेथे मंदिर आणि कुटुंब तेथे सत्संग’ या भावनेला साकार करणाऱ्या ‘गृहसभा’ उपक्रमाला सावदा शहरात नव्या उत्साहाने सुरुवात झाली आहे. कुटुंबातील संस्कार, सुसंवाद, प्रेम, एकात्मता आणि सकारात्मक विचारांना बळ देणाऱ्या या उपक्रमांतर्गत संत-महंतांकडून भक्तांच्या घरी जाऊन गृहसभा घेण्यात येत आहेत.

स्वामिनारायण संप्रदायात ‘गृहसभा’ ही अत्यंत सुंदर आणि संस्कारक्षम परंपरा मानली जाते. ‘सत्सङ्गत्वे निस्सङ्गत्वं, निस्सङ्गत्वे निर्मोहत्वम् । निर्मोहत्वे निश्चलतत्त्वं, निश्चलतत्त्वे जीवन्मुक्तिः ॥’ या भावनेनुसार सत्संगाच्या माध्यमातून आसक्ती व मोह कमी होऊन मनुष्याला स्थिर, निर्मळ आणि आध्यात्मिक जीवनाची अनुभूती मिळते.

गृहसभा ही केवळ धार्मिक चर्चा नसून कुटुंबातील सदस्यांना एकत्र आणणारी संस्कारशाळा आहे. संतांच्या सान्निध्यातून घरातील नकारात्मक विचार, निरुत्साह आणि आध्यात्मिक शैथिल्य दूर होऊन भक्ती, श्रद्धा, आनंद आणि चैतन्य निर्माण होते. संत-महंत घरात येऊन कुटुंबीयांशी आत्मीय संवाद साधतात आणि घरालाच सत्संगाचे पवित्र केंद्र बनवितात.

पूर्वापार संप्रदायात सुरू असलेल्या या उपक्रमाला कालौघात मंडळातील मनुष्यबळाची कमतरता तसेच विविध कारणांमुळे काही काळ मर्यादा आल्या होत्या. आता मंदिराचे कोठारी शास्त्री स्वामी स्वयंप्रकाशदासजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शास्त्री स्वामी भक्तीप्रियदासजी यांच्या माध्यमातून गृहसभा उपक्रम पुन्हा नव्या उत्साहाने सुरू करण्यात आला आहे.

सावदा शहरात या उपक्रमांतर्गत १८ ऑगस्ट २०२६ रोजी श्री. यशवंत अर्जुन बऱ्हाटे यांच्या कुटुंबीयांच्या घरी गृहसभा घेण्यात आली. त्यानंतर १९ ऑगस्ट रोजी चि. दिग्विजय हरीश फिरके यांच्या कुटुंबीयांच्या घरी, तर २० ऑगस्ट रोजी श्री. नंदकिशोर घनश्याम पाटील आणि २१ ऑगष्ट रोजी गणेश सुखदेव सापकर यांच्या कुटुंबीयांच्या घरी गृहसभा घेऊन सत्संगाचा दीप प्रज्वलित करण्यात आला.

संतांचे घराघरांत होणारे हे आगमन म्हणजे केवळ भेट नसून भक्तीचा प्रसाद, संस्कारांची शिदोरी आणि आध्यात्मिक ऊर्जेचा संचार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. अशा गृहसभांमुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये भक्तीभाव वाढण्यासोबतच परस्परांतील प्रेम, संवाद आणि एकात्मता अधिक दृढ होण्यास मदत होत आहे.

आपल्या घरीही घेता येणार गृहसभा

ज्या हरिभक्तांना किंवा नागरिकांना आपल्या घरी गृहसभा आयोजित करायची असेल, त्यांनी मंदिराशी संपर्क साधावा, असे आवाहन मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे. संतांच्या सान्निध्यात आपल्या घरीही सत्संगाचा पवित्र दीप प्रज्वलित करण्याची संधी या उपक्रमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

‘घराघरांत सत्संगाचा दीप तेवत राहो, प्रत्येक कुटुंबात भक्तीचा सुगंध दरवळत राहो आणि संतांच्या पावन सान्निध्याने प्रत्येक घराचे मंदिरात रूपांतर होवो,’ अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

सत्संगाच्या अभिवृद्धीसाठी राबविण्यात येत असलेला हा उपक्रम निश्चितच अभिनंदनीय आणि अनुकरणीय असून, अधिकाधिक हरिभक्त व नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

॥ जय स्वामिनारायण ॥


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.