Contact Banner

मेंदूत अति रक्तस्त्राव; तातडीच्या शस्त्रक्रियेतून ४२ वर्षीय रुग्णाला जीवदान डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मेंदू व मणका विकार तज्ज्ञांचे यश

 

brain-hemorrhage-42-year-old-patient-saved-by-emergency-surgery-dr-ulhas-patil-hospital-jalgaon



मेंदूत अति रक्तस्त्राव; तातडीच्या शस्त्रक्रियेतून ४२ वर्षीय रुग्णाला जीवदान

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मेंदू व मणका विकार तज्ज्ञांचे यश

लेवाजगत न्यूज जळगाव : अपघातात डोक्याला जबर मार लागून मेंदूत मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झालेल्या ४२ वर्षीय रुग्णावर डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मेंदू व मणका विकार तज्ज्ञांनी तातडीने यशस्वी शस्त्रक्रिया करून जीवदान दिले. गंभीर अवस्थेत दाखल झालेल्या या रुग्णावर वेळेचे महत्त्व ओळखून तत्काळ उपचार करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर काही काळ कृत्रिम श्वसनयंत्रणेची आवश्यकता भासली; मात्र अवघ्या तीन दिवसांत प्रकृतीत लक्षणीय सुधारणा होऊन रुग्ण सामान्य स्थितीकडे परतला.

मिळालेल्या माहितीनुसार, ४२ वर्षीय सुरेश यांचा अपघात झाला होता. या अपघातात डोक्याला जोरदार मार लागल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली. नातेवाईकांनी त्यांना तातडीने डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर मेंदू व मणका विकार तज्ज्ञ डॉ. विपूल राठोड यांनी प्राथमिक तपासणी करून तातडीने सीटी स्कॅन केला. सीटी स्कॅनमध्ये मेंदू व कवटीच्या खाली मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचे तसेच रक्तस्त्रावामुळे मेंदूवर मोठा दाब निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले.






रुग्णाची स्थिती गंभीर असल्याने विलंब झाल्यास मेंदूला कायमस्वरूपी इजा होण्यासोबतच जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मेंदू व मणका विकार तज्ज्ञ डॉ. विपूल राठोड, डॉ. प्रितम दास व डॉ. श्रृती खंडागळे यांच्या पथकाने ‘डिकंप्रेसिव्ह क्रेनियोटोमी’ ही महत्त्वपूर्ण शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेद्वारे मेंदूवरील वाढलेला दाब कमी करण्यासोबतच साचलेले रक्त बाहेर काढण्यात आले.

गंभीर अवस्थेतील रुग्णावर वेळ न दवडता करण्यात आलेल्या या शस्त्रक्रियेमुळे पुढील संभाव्य गुंतागुंत टाळण्यास मदत झाली. शस्त्रक्रियेसाठी भूलशास्त्र तज्ज्ञ डॉ. शितल, डॉ. साक्षी व डॉ. सुश्मिता यांनी सहकार्य केले. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला काही काळ कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले. अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या देखरेखीखाली सातत्याने उपचार करण्यात आले. उपचारांना रुग्णाने चांगला प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे, अवघ्या तीन दिवसांत त्याच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली आणि त्याने सामान्य स्थितीकडे वाटचाल सुरू केली.

ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत संपूर्णपणे मोफत करण्यात आल्याने रुग्णाच्या कुटुंबीयांना मोठा आर्थिक दिलासाही मिळाला.

कोट :
“डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीनंतर मेंदूत रक्तस्त्राव झाल्यास प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असते. वेळेत निदान आणि योग्य उपचार मिळणे अत्यंत गरजेचे असते. या रुग्णाच्या सीटी स्कॅनमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव व मेंदूवर दाब दिसून आला. त्यामुळे विलंब न करता डिकंप्रेसिव्ह क्रेनियोटोमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर अतिदक्षता विभागातील उपचार आणि सतत निरीक्षणामुळे रुग्णाच्या प्रकृतीत अपेक्षेप्रमाणे सुधारणा झाली.”
डॉ. श्रृती खंडागळे, निवासी डॉक्टर, डॉ. उल्हास पाटील रुग्णालय

dhanaji-nana-mahavidyalaya-faizpur-national-sports-day-celebration

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.