Contact Banner

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये अँटी-रॅगिंग सप्ताह उत्साहात

 

godavari-college-of-nursing-anti-ragging-week-jalgaon

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये अँटी-रॅगिंग सप्ताह उत्साहात

लेवाजगत न्यूज जळगाव : गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथे ‘यारी रॅगिंग विरोधी युवा मोहीम’ या संकल्पनेअंतर्गत अँटी-रॅगिंग सप्ताह उत्साहात आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये रॅगिंगविरोधी जनजागृती निर्माण करून सुरक्षित, सन्मानपूर्ण, मैत्रीपूर्ण आणि रॅगिंगमुक्त कॅम्पस निर्माण करणे हा या सप्ताहाचा प्रमुख उद्देश होता.

डॉ. अक्षता पाटील हॉल येथे उद्घाटन समारंभ व अँटी-रॅगिंग शपथविधीने सप्ताहाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे उद्घाटन अ‍ॅड. शैलेश रविकांत नागला, एलएलएम यांच्या हस्ते झाले. नागरी व फौजदारी कायद्याच्या क्षेत्रातील १३ वर्षांच्या अनुभवाच्या आधारे त्यांनी विद्यार्थ्यांना रॅगिंगचे कायदेशीर परिणाम, तसेच त्याचे विद्यार्थ्यांच्या मानसिक व शैक्षणिक जीवनावर होणारे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन केले. रॅगिंग रोखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहितीही त्यांनी दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी अँटी-रॅगिंग शपथ घेत रॅगिंगला नकार देण्याचा निर्धार व्यक्त केला.

सप्ताहादरम्यान विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थी संवाद व रॅगिंग प्रतिबंध जनजागृती उपक्रम, ‘रॅगिंगला नकार द्या’ या विषयावर घोषवाक्य व पोस्टर स्पर्धा, अँटी-रॅगिंग जनजागृती रॅली, लोगो डिझायनिंग तसेच फोटोग्राफी स्पर्धा घेण्यात आल्या. जनजागृती रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध घोषवाक्यांच्या माध्यमातून रॅगिंगविरोधी संदेश दिला.

सप्ताहाच्या समारोपानिमित्त शॉर्ट फिल्म सादरीकरण, प्रमाणपत्र वितरण आणि समारोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून रॅगिंगचे गांभीर्य, त्याचे विद्यार्थ्यांवर होणारे परिणाम आणि रॅगिंगमुक्त वातावरणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

या अँटी-रॅगिंग सप्ताहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये परस्पर सन्मान, सहकार्य, संवेदनशीलता आणि जबाबदारीची भावना रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. ‘रॅगिंगला नाही, मैत्रीला होकार’ हा सकारात्मक संदेश देत सप्ताह उत्साहात संपन्न झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.