व्यवसाय मार्गदर्शनातून स्वावलंबनाचा नवा मार्ग; महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाचा पुढाकार
व्यवसाय मार्गदर्शनातून स्वावलंबनाचा नवा मार्ग; महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाचा पुढाकार
मुंबईत पहिले व्यवसाय मार्गदर्शन सत्र; निवृत्त अधिकारी व विद्यार्थ्यांना तज्ज्ञांचे वैयक्तिक मार्गदर्शन
खेमचंद पाटील | लेवा जगत, मुंबई प्रतिनिधी-
समाजातील तरुण, निवृत्त अधिकारी आणि नवउद्योजकांना व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी होण्यासाठी योग्य दिशा मिळावी, या उद्देशाने महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाच्या वतीने मुंबईतील हॉटेल सुबा इंटरनॅशनल येथे व्यवसाय मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. महासंघाच्या सल्लागार समितीचे सदस्य उद्योजक रत्नाकर चौधरी आणि मुंबई विभागाचे नितीन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे पहिले सत्र उत्साहात पार पडले.
महासंघाच्या वतीने आयोजित या पहिल्याच व्यवसाय मार्गदर्शन सत्रात समाजातील चार होतकरू व्यक्तींनी सहभाग घेतला. यामध्ये ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकतेच सेवानिवृत्त झालेले अधिकारी, पोलीस खात्यातून निवृत्त झालेले अधिकारी तसेच अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणारे दोन विद्यार्थी यांचा समावेश होता.
सेवानिवृत्तीनंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अधिकाऱ्यांना निवृत्तीनंतर उपलब्ध आर्थिक साधनांचा सुरक्षित वापर, योग्य व्यवसायाची निवड, जोखीम आणि नियोजन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पोलीस सेवेतून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याला मिळालेली निवृत्तीची रक्कम योग्य पद्धतीने गुंतवून, स्वतःच्या अनुभवाला अनुरूप व्यवसाय कसा उभारता येईल, यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली.
दरम्यान, अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांकडे स्टार्टअपची कल्पना होती. मात्र, ती प्रत्यक्षात कशी आणायची, व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य वेळ कोणती, सुरुवात कुठून करायची आणि व्यवसायाचा आराखडा कसा तयार करायचा, याबाबत त्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता होती. त्यांच्या कल्पनांचा सखोल विचार करून व्यवसायाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसंदर्भात त्यांना आवश्यक दिशा देण्यात आली.
प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती, क्षमता आणि गरज वेगळी असल्याने सामूहिक व्याख्यानाऐवजी वैयक्तिक मार्गदर्शनावर विशेष भर देण्यात आला. कॉन्फरन्स रूममध्ये प्रेझेंटेशन व बैठकीची योग्य व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे व्यवसायाचे आर्थिक गणित, गुंतवणूक, व्यवसाय आराखडा, संभाव्य अडचणी तसेच सहभागींच्या शंकांवर मोकळेपणाने चर्चा करता आली.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे मार्गदर्शन सत्र पूर्णपणे विनामूल्य ठेवण्यात आले होते. सहभागी व्यक्तींना केवळ येण्या-जाण्याचा खर्च करावा लागला. व्यवसायासंदर्भातील महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करताना गोपनीयतेलाही विशेष महत्त्व देण्यात आले. आर्थिक स्थिती, कुटुंबीयांचा दबाव, व्यवसायातील जोखीम आणि वैयक्तिक अडचणी याबाबत सहभागी व्यक्तींनी निःसंकोचपणे चर्चा करावी, यासाठी सुरक्षित व विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यात आले.
उद्योजक रत्नाकर चौधरी यांनी प्रत्येक सहभागी व्यक्तीला वैयक्तिक पातळीवर मार्गदर्शन केले. सत्राच्या शेवटी सहभागींच्या चेहऱ्यावर दिसणारा आत्मविश्वास आणि समाधान हेच या उपक्रमाचे खरे यश असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान सहभागींसाठी चहा-कॉफीसह नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. हॉटेल व्यवस्थापनाकडून करण्यात आलेल्या आदरातिथ्यामुळे कार्यक्रमाला आपुलकीचे वातावरण लाभले.
या उपक्रमात उल्हासनगरचे सामाजिक कार्यकर्ते नितीन जावळे यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. समाजबांधवांच्या अडचणींमध्ये तत्परतेने मदत करण्यासाठी ते परिचित असून, विविध सामाजिक उपक्रमांच्या आयोजनात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. नुकतेच नितीन जावळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाच्या वतीने कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी रिता चौधरी यांचा सत्कार केला होता. समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान तसेच समाजबांधवांना विविध क्षेत्रांत प्रोत्साहन देण्याच्या उपक्रमांमध्ये त्यांचा सातत्याने सहभाग राहिला आहे.
महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ म्हणजे केवळ सभा आणि कार्यक्रमांचे व्यासपीठ न राहता समाजातील पुढील पिढीचा हात धरून त्यांना स्वावलंबनाकडे नेणारे माध्यम असावे, अशी भूमिका या उपक्रमातून पुढे आली आहे. निवृत्तीनंतर व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या व्यक्तींपासून स्वतःची स्टार्टअप कल्पना प्रत्यक्षात आणू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत समाजातील प्रत्येक घटकाला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाल्यास समाजाची आर्थिक व सामाजिक ताकद अधिक भक्कम होऊ शकते.
या पहिल्या व्यवसाय मार्गदर्शन सत्राला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन भविष्यात अशी मार्गदर्शन सत्रे शहरोशहरी तसेच गावोगावी आयोजित करण्याचा मानस महासंघाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
व्यवसायासोबतच करिअर, शिक्षण, कौटुंबिक विषय, वैद्यकीय बाबी, सामाजिक प्रश्न, वैयक्तिक अडचणी आणि गुंतवणूक अशा विविध विषयांवर समाजबांधवांना योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा महासंघाचा प्रयत्न राहणार आहे. समाजातील गरजू आणि मार्गदर्शनाची आवश्यकता असलेल्या व्यक्तींनी महासंघाशी संपर्क साधावा, असे आवाहन सल्लागार समितीचे सदस्य रत्नाकर चौधरी यांनी केले.
‘स्वावलंबी व्यक्ती घडविणे म्हणजे सक्षम समाज घडविण्याची पहिली पायरी’ या विचाराला कृतीची जोड देणारा हा उपक्रम समाजासाठी सकारात्मक आणि दिशादर्शक पाऊल ठरत आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत