पिंपरी-चिंचवडमध्ये खानदेश सार्वजनिक कानबाई माता उत्सव २०२६ ला सुरुवात
पिंपरी-चिंचवडमध्ये खानदेश सार्वजनिक कानबाई माता उत्सव २०२६ ला सुरुवात
शिवनगरीतील तुळजाभवानी मंदिरात महत्त्वाची बैठक; २२ ते २४ ऑगस्टदरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम
लेवाजगत न्यूज पिंपरी-चिंचवड :-पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे परिसरात वास्तव्यास असलेल्या खानदेशवासीयांसाठी संस्कृती, परंपरा आणि धार्मिक वारसा पुढील पिढीपर्यंत अखंडितपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणाऱ्या
‘भव्य खानदेश सार्वजनिक कानबाई माता उत्सव २०२६’च्या तयारीला सुरुवात झाली आहे. उत्सवाच्या नियोजनासाठी शिवनगरी येथील तुळजाभवानी मंदिरात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
खानदेश सार्वजनिक कानबाई उत्सव मंडळाच्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीत उत्सवातील विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले.
यंदा २२ ते २४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत कानबाई माता उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. शनिवार, २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता ‘सत्ता पूजन (गहू दळणे)’ या धार्मिक कार्यक्रमाने उत्सवाची सुरुवात होईल. हा कार्यक्रम तुळजाभवानी मंदिर, शिवनगरी, बिजलीनगर, चिंचवड येथे होणार आहे.
रविवार, २३ ऑगस्ट रोजी दुपारी २ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत कानबाई माता आगमनाची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. तुळजाभवानी मंदिर, शिवनगरी येथून सुरू होणारी ही मिरवणूक शुभम गार्डन, वाल्हेकरवाडी येथे पोहोचेल. मिरवणुकीत शिरपूर येथील गोल्डन बँड आणि अमळनेर येथील राधेकृष्णा बँड सहभागी होणार आहेत. महिलांनी कलश घेऊन, तर पुरुषांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सायंकाळी ७ वाजता शुभम गार्डन, वाल्हेकरवाडी येथे कानबाई मातेची स्थापना होईल. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कानबाई माता पूजन व उत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७ ते ८ या वेळेत मान्यवरांचा सन्मान व मनोगत होईल. रात्री ८ वाजल्यापासून देवीचे दर्शन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.
उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणून खानदेश फ्रेंड सर्कल ग्रुप, शिरपूर-धुळे-पुणे यांच्या कलाकारांसह गायक सागर देशमुख, दिलीप बाशिंगे, कुणाल महाराज आणि दिनेश बाशिंगे यांच्या सहभागातून रात्री ८ ते १० या वेळेत कानबाई मातेच्या गीतांचा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सोमवार, २४ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता शुभम गार्डन ते जाधव घाट, रावेत या मार्गावर कानबाई माता विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत शिरपूरचा गोल्डन बँड विशेष आकर्षण ठरणार आहे.
या महोत्सवासाठी खानदेश मराठा मंडळ, मराठा पाटील समाज मंडळ, गुजर स्नेहवर्धिनी, केदारेश्वर प्रतिष्ठान, खानदेश तिळवण तेली समाज मंडळ, लेवा पाटीदार समाज मंडळ, खानदेश माळी महासंघ, संतसेना महाराज खानदेश नाभिक मंडळ, भारतीय बहुजन विकास समिती, खानदेश अहिराणी कस्तुरी मंच, आहिरे मराठा मंडळ, वारी समाज मंडळ, सोनार समाज मंडळ, धनगर समाज मंडळ, राजपूत समाज मंडळ, महाराणा मित्र मंडळ, कुंभार समाज मंडळ, बडगुजर समाज मंडळ, वंजारी समाज मंडळ, शिंपी समाज मंडळ, खानदेश लाड शाखीय वाणी समाज मंडळ, क्षत्रिय माळी समाज मंडळ, कासार समाज मंडळ, लोहार समाज मंडळ, अखिल टोकरे कोळी समाज मंडळ, सुतार समाज मंडळ, कानूाई सेवा फाउंडेशन (खानदेश) यांसह विविध खानदेशी समाज मंडळे सहआयोजक म्हणून सहभागी आहेत.
‘खानदेशचा सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न’
उत्सवाच्या नियोजनाबाबत संयोजन समितीचे प्रमुख नामदेव ढाके म्हणाले, “पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या संख्येने वास्तव्यास असलेल्या खानदेशवासीयांना आपली संस्कृती, परंपरा आणि धार्मिक जाणिवांचा वारसा पुढील पिढीपर्यंत अखंडितपणे पोहोचविता यावा, हा या महोत्सवामागील मुख्य उद्देश आहे. खानदेशची समृद्ध संस्कृती शहरात एकाच ठिकाणी अनुभवता यावी, यासाठी सर्व समाजबांधव उत्साहाने तयारी करत आहेत. बाप्पा आणि देवीच्या कृपेने हा महोत्सव भव्यदिव्य होईल आणि संपूर्ण खानदेश परिवार एकत्र येऊन एकोपा व आनंदाचा संदेश देईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत